ग्रामपंचायत मधून 5 टक्के निधी दिव्यांगावर केला खर्च
दिव्यांग व्यक्ती हे समाजातील एक घटक -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या वतीने 25 दिव्यांग लाभार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्या व टेबलचे वाटप करण्यात आले. दरवर्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राखीव ठेवण्यात आलेला 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च केला जातो. मार्च पूर्वी दिव्यांगांना या निधीतून दैनंदिन वापरासाठी खुर्च्या व टेबलची भेट देण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते दिव्यांगांना खुर्च्या व टेबलचे साहित्य वितरीत करण्यात आले. सरपंच लताबाई फलके, उपसरपंच किरण जाधव व ग्रामपंचायत अधिकारी गोवर्धन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सह सचिव संजय पुंड, नंदाबाई पुंड, जनाबाई शिंदे, सुनील जाधव, संतोष जाधव, संतोष फलके, बाळू फलके, मयुर काळे आदींसह गावातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती हे समाजातील एक घटक आहे. अनेक दिव्यांग बांधवांनी परिस्थितीवर मात करुन आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून 5 टक्के निधी खर्च केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांसाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन संजय पुंड यांनी आभार मानले.