प्रयागराज येथील गंगाजल हौदेत टाकून वृध्दाश्रमाच्या आजी-आजोबांनी केली आंघोळ
माणुसकीशी नाते जोडणारा सोहळा -जागृती ओबेरॉय
नगर (प्रतिनिधी)- शहरातील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिलांनी रांजणगाव, फत्तेपूर (ता. नेवासा) येथील शरणपूर वृध्दाश्रमासाठी 15 हजार लीटर क्षमतेचा हौद बांधून दिला. त्याचा लोकार्पण नुकताच पार पडला. प्रयागराज येथील कुंभ मेळयातून आणलेले गंगाजल या हौदेत टाकून वृध्दाश्रमातील सर्व आजी-आजोबांना आंघोळीसाठी ते पाणी देण्यात आले होते. तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृध्दाश्रमाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, कोषाध्यक्ष अर्चना खंडेलवाल, प्रकल्प प्रमुख तथा संचालिका गीतांजली माळवदे, सोनीया कुंद्रा, वंदना गोसावी, दीपा रोहिडा, रोहिणी दयानंद पाटील, दिपाली देवदूतकर, अंजली विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व शरणपूर वृद्धाश्रमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब मुटकुळे, संस्थेच्या सचिव सुरेखा मगर, स्मिता देशमुख, सुनिता लेकुरवाळे, नूतन भोसले, नीशा पाटील, भारती यादव, पूजा गोंडाळ, मनीषा कंक, वर्षा शेकटकर, तृप्ती कोठारी, माधुरी येळाई, सोनी पाठक, वैशाली उत्तेकर आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या, वृध्दाश्रमातील आजी-आजोबा आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, वृध्दाश्रमातील सर्व ज्येष्ठ आजी-आजोबा हे निराधार नसून, सेवाप्रीतच्या सर्व महिला सदस्या त्यांच्या नाती आहेत. त्यांच्या सुख-दु:खात कायम बरोबर राहून त्यांच्याशी कुटुंबाप्रमाणे ऋणानुबंध जोडले जाणार आहे. तुम्ही शरीराने कमजोर असू शकता, पण मनाने कधीही कमजोर होऊ नका. जीवनात आनंदी आणि उत्साही राहण्याचे त्यांनी सांगितले. हा फक्त जलप्रकल्प नसून, माणुसकीशी नाते जोडणारा सोहळा आहे. ज्येष्ठ नागरिक कुटुंबातील संपत्ती असून, त्यांच्या मार्गदर्शनाने सुखी जीवनाची यशस्वी वाटचाल होणार असल्याचेही ओबेरॉय म्हणाल्या.
गीतांजली माळवदे म्हणाल्या की, शरणपूर वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न बिकट बनल्यानंतर मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. या हौद मध्ये 15 हजार लीटर क्षमतेचे पाणी साचवून ठेवण्यात येणार असल्याने, ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे. या कार्याने ज्येष्ठांचे जीवन सुखी करण्यासाठी व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब मुटकुळे यांनी सेवाप्रीतच्या कार्यातून इतरांना देखील प्रेरणा मिळून वृध्दाश्रमातील ज्येष्ठांचे जीवन सुखी करण्यासाठी हातभार लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
सेवाप्रीतच्या महिलांनी जवळपास पन्नास हजार रुपये खर्च करुन वृध्दाश्रमासाठी हौद बांधून दिला आहे. या कार्यक्रमात सर्व महिलांनी ज्येष्ठ आजी-आजोबांना मिष्टान्न भोजनाचे वाटप केले. तर त्यांच्या मनमोकळे गप्पा मारुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.