महिला सक्षमीकरण व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसाराची दखल
नगर (प्रतिनिधी)- येथील मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना पुणे येथे सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या (अंबाजोगाई, जि. बीड) वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रात सुरु असलेले कार्य व राजमाता जिजाऊ यांचे विचाराच्या प्रचार-प्रसारासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल सौ. काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात समाजसेविका विद्याताई गडाख यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे महापालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, केंद्रीय फिल्म सल्लागार समिती मंडळ सदस्य डॉ. स्मिता बारवकर, संगीता शिंदे, राणी पाटील, तृप्ती ढवण, मुख्याध्यापिका अर्चना सावंत, संस्थेचे अध्यक्ष मीनाक्षी डोंगरे, उपाध्यक्ष माधुरी साळवे, सचिव भारतीय एकलारे आदींसह विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अनिता काळे या भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचे संघटन केले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योग, व्यावसायिक प्रशिक्षण राबविणे, विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान, चर्चासत्राच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करत आहेत.
व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.