शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये किरण कहेकर यांनी जिल्हास्तरावर पटकाविले द्वितीय क्रमांक
नगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या अध्यापकांनी शहरासह जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये यश संपादन केले आहे. या प्रदर्शनात अध्यापकांनी आपल्या शालेय गुणवत्तेची मोहर उमटवली आहे.
महापालिका शिक्षण विभाग व गणित विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच शहरातील कार्मेल कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये 52 वे शहर गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये मार्कंडेय शाळेचे अध्यापक किरण कहेकर यांनी माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटामधून प्रथम क्रमांक, तर अर्चना शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक गटातून व्दितीय क्रमांक पटकाविला. या प्रदर्शनात शहरातील एकूण 51 शाळांनी सहभाग नोंदविला होता. दोन्ही गुणवंत शिक्षकांना मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्हास्तरीय गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनासाठी कहेकर यांची निवड झाली होती. नुकतेच जिल्हास्तरीय प्रदर्शन धर्मवीर वीरगाव (ता. अकोले) येथील आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पार पडले. या प्रदर्शनात देखील किरण कहेकर यांना माध्यमिक शिक्षक गटामधून शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये व्दितीय क्रमांक मिळाला. कहेकर यांना चषक, रोख रक्कम व प्रमाणपत्राने माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पद्मशाली विदया प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, विश्वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र म्याना, भिमराज कोडम, सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम, व्हाईस चेअरमन व सर्व पदाधिकारी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी अध्यापकांचे पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचीत विश्वस्त व श्रमिक जनता हाऊसिंग सोसायटीचे सचिव शंकर येमूल यांनी त्यांचे अभिनंदन केले.