महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध
महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे आवश्यक -अंजली आव्हाड
नगर (प्रतिनिधी)- महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला दिलेली स्थगिती हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.23 जानेवारी) शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. तर एका महिलेला टार्गेट करुन त्यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य व टिका करणाऱ्या विकृतींचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद देण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. काळ्या फिती बांधून युवती-महिलांसह राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्षा अंजली आव्हाड, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, साधनाताई बोरुडे, सूरज शिंदे, राष्ट्रवादी युवकचे इंजि. केतन क्षीरसागर, आशा गायकवाड, संगीता ससे, दिपाली आढाव, प्रेमा जावळे, अश्विनी शिंदे, सुजाता दिवटे, निलोफर सय्यद, नितू औशेकर, सुनंदा शिरवाळे, सुप्रिया काळे आदींसह युवती, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंजली आव्हाड म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आदिती तटकरे यांनी मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहे. विरोधकांच्या पोटात गोळा उठल्याने त्यांनी एका महिलेला टार्गेट केले आहे. या विकृतींचा सर्व महिलांच्या वतीने निषेध असून, महिलांच्या सन्मानासाठी त्यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री यांनी त्यांच्या पदाची स्थगिती उठवावी, अन्यथा राज्यातील युवती विभागाच्या वतीने मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
वैभव ढाकणे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांनी महिलांचा नेहमीच मान-सन्मान राखला, मात्र त्या महाराष्ट्रात सध्या एका महिला लोकप्रतिनिधीला अपमानित करुन त्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. महिलांविरोधात असलेल्या विकृतीचा निषेध नोंदविण्यासाठी व सन्मानाने तटकरे यांना पालकमंत्री पद मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.