अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. डोंगरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना दुसऱ्यांदा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
40 व्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे शाळेत कार्यरत असून, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. ग्रामीण भागात काव्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. तर वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावण्याचे कार्य ते करत आहे. डोंगरे यांनी जिल्हा पातळीवर स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविले. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु आहे.
विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
