• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात येणारी अवजड वाहने व वाहतुक कोंडी उठली विद्यार्थ्यांसह नारिकांच्या जीवावर

ByMirror

Oct 4, 2024
वाहतुकीचे नियोजन करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

वाहतुकीचे नियोजन करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

शहरात अवजड वाहनांना बंदी करुन चौका-चौकात वाहतुक पोलीसांच्या नेमणुकीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी व अनेक लहान मोठ्या अपघातात नागरिकांसह शाळकरी मुलांचा जीव जात असताना तातडीने वाहतुकी संदर्भात नियोजन करून अवजड वाहनांना शहरात बंदी करण्याची मागणी कल्याण रोड व नालेगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेल ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन शाळा भरताना सकाळी व शाळा सुटताना संध्याकाळी वाहतुक कोंडी होणाऱ्या चौका-चौकात वाहतुक पोलीस नेमण्याची मागणी केली. यावेळी पारुनाथ ढोकळे, दत्ता गाडळकर, ओंकार शिंदे, पै. महेश लोंढे, ॲड. युवराज शिंदे, भगवान काटे, पंडितराव हराळ, बबन खामकर, रोहिदास दाते, मदन काशिद, सुरेंद्र बोऱ्हाडे, राजाराम रोहकले, विनायक आडेप, रितेश आडेप, विश्‍वास खिलारी, योगेश डेरे, कांतीलाल ढवळे, सचिन येठेकर, हरिभाऊ भोस, सुशीलकुमार नन्नवरे, तेजस पवार, जयवंत ठाणगे, ज्ञानदेव आठरे, गणेश गाडगे, संतोष ठाणगे, ॲड. अभिजित देशमुख, निलेश बाविस्कर, सुखदेव हापसे, देवेंद्र ढोकळे आदी उपस्थित होते.


शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होत आहे. शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना, अवजड वाहने रस्त्यावर येत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे व अवजड वाहनांच्या घुसखोरीमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. शाळेतील विद्यार्थी जीवमुठीत धरुन रस्त्यावरून ये-जा करत आहेत. शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत, त्यामुळे सध्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. नुकतेच शाळा सुटल्यानंतर कल्याण रोड परिसरातील एका शालकरी विद्यार्थ्यांचा अवजड वाहनाच्या धडकेत बालिकाश्रम रोड, सर्वोदय कॉलनी येथे दुर्दैवी अपघाती निधन झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


शाळा भरताना व सुटताना प्रमुख रस्त्यावरील चौका-चौकात वाहतूक पोलीस असणे आवश्‍यक आहे. पोलीस ड्युटीवर असतील तर निश्‍चितच वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यामुळे अपघात टाळता येणार आहे. कल्याण रोड परिसरात सिना नदीच्या पुलाचे काम सुरू आहे. या महामार्गावरून अनेक अवजड वाहने शहरात प्रवेश करतात. त्यामुळे नेप्ती नाका, दिल्ली गेट परिसर, सिद्धीबाग चौक, जुने कोर्ट, आप्पू हत्ती चौक, जिल्हा रुग्णालय परिसर, वाडिया पार्क, आयुर्वेद चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात होत आहे. याच रस्त्यावर अनेक कार्यालय, दाट संख्या असलेल्या शाळा, दुकाने आहेत. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करणे आवश्‍यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत शहरात अवजड वाहनांना बंदी करुन त्या नियमाची अंमलबजावणी व्हावी, वाहतुक कोंडी होणाऱ्या चौका-चौकात वाहतुक पोलीसांची नेमणुक व्हावी, शाळकरी विद्यार्थी अथर्व वेताळ याच्या अपघाती निधनाची चौकशी करुन त्याच्या परिवाराला न्याय देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *