• Tue. Jul 1st, 2025

शहरातील नागरी सुविधांच्या वाताहातीच्या निषेधार्थ महानगर पावीर सूर्यनामा जारी

ByMirror

Sep 30, 2024

महात्मा गांधीजी जयंती दिनी नगरकरांच्या साक्षीने दिल्लीगेट समोर होणार आंदोलन

पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पाणी, वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांची झालेली वाताहातीचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी (दि.2 ऑक्टोंबर) महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन केले जाणार आहे. दिल्लीगेट वेस समोर पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने नगरकरांच्या साक्षीने हे आंदोलन होणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.


स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आज सर्वत्र लोकमकात्या म्हणजे सार्वजनिक प्रश्‍नांबाबत मला काय त्याचे? आणि सत्ता मालमत्ता पेंढाऱ्यांचे फावले आहे. सत्तासंपत्ती आणि फुकटची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील नेते कार्यकर्ते जनतेची फसवणूक करत आहे. अहमदनगर शहरात लहरीप्रमाणे पिण्याचे पाणी दिले जाते. कधी पाच-पाच दिवस पाणी मिळत नाही. पाणी वाटपातील कर्मचारी शिरजोर झाले आहेत. शहरात दिवसातून अनेक वेळेस वीज जाते आणि चार ते दहा तास वीज येत नाही. वीज महामंडळाचे अधिकारी कोणालाही जबाबदार राहिलेले नाही. महापालिका हद्दीतील रस्त्यांची परिस्थिती म्हणजे अहमदनगरच्या प्रत्येक नागरिकांच्या वाट्याला किमान पाच खड्डे आल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


सत्ताधारी ताबेमारी, सत्तामारी आणि टक्केवारी यामध्ये गुंतलेले आहेत. आजच्या परिस्थितीत एकट्या शहरात पाच ते सात हजार ताबेमारी करणाऱ्यांना मोठा रोजगार मिळालेला आहे. गेल्या अनेक वर्षात नोकऱ्या स्वयंरोजगार सरकारला देता आले नाही, परंतु ताबेमारीचे पेव शहरात सर्वत्र फुटले आहे. लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती पुढाऱ्यांकडे नाही. त्याचबरोबर सरकार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीची दिवाळखोरी घोषित केलेली आहे. एकंदरीत अहमदनगर शहर म्हणजे अंधेरीनगरी झाली असून, जनतेमध्ये मकात्यागिरी पोहचली आणि सार्वजनिक जीवनात ताबेमारीचा हैदोस निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या शहराचे नामांतर अहिल्यादेवीच्या नावावर करण्याचा खटाटोप म्हणजे अहिल्यादेवींच्या महान नावाला बदनामी आणण्यासारखे आहे. सगळीकडे खड्डे, अनागोंदी, जनतेचा शिव्या शाप आणि स्वातंत्र्यानंतर शहरासह देशांमध्ये सुरू असलेली मकात्यागीरी हा लोककर्कासूर रोग व्यापक होत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी मकात्यागीरीचा कात टाकली पाहिजे आणि लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीची प्रचिती दिलेल्या लोकांना निवडून दिले पाहिजे. शहरामध्ये असलेली अनागोंदी सर्वांससमोर आणण्यासाठी पावीर सूर्यनामा करण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे. या आंदोलनासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम, अशोक भोसले, कैलास पठारे, वीरबहादूर प्रजापती आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *