तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविले विजेतेपद
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाचे कुस्तीपटू संदेश जाधव व किर्ती जाधव या भाऊ-बहिणीची जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजेतेपद पटकाविले.
मुलांची नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा रुईछत्तीसी येथे पार पडली. यामध्ये संदेश जाधव याने 17 वर्षा आतील 80 किलो वजनगटात (ग्रिकोरोमन) विजेतेपद पटकाविले. तर निमगाव वाघा येथे झालेल्या मुलींच्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत किर्ती जाधव हिने 14 वर्षा आतील 62 किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकाविला.
दोन्ही खेळाडूंची कर्जत येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर 14 वर्षा आतील 33 किलो वजनगटात समृध्दी फलके आणि 14 वर्षा आतील 35 किलो वजनगटात सार्थक पाचारणे या खेळाडूंनी उपविजेतेपद पटकाविले आहे.
या खेळाडूंना नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंचे माजी सरपंच साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मंदा साळवे, तेजस केदारी, अमोल वाबळे, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, तृप्ती वाघमारे, राम जाधव, मयुरी जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.