• Wed. Oct 15th, 2025

पाच दिवसीय डी परवाना फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप

ByMirror

Jul 24, 2024

नवोदित फुटबॉल प्रशिक्षकांनी जाणून घेतले खेळाचे तंत्र व माहिती

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिकृत फुटबॉल प्रशिक्षक होण्यासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनेव वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय डी परवाना प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. अहमदनगर महाविद्यालय येथे पार पडलेल्या या शिबिरास खेळाडू, प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला.


अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दिलीप भालसिंग, उपप्राचार्य डॉ. रज्जाक सय्यद, फिजीकल डायरेक्टर डॉ. डॉमिनीक सॅव्हिओ वेगास, प्रा. माणिक विधाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस म्हणाले की, शहरात पहिल्यांदाच व अहमदनगर महाविद्यालयात फुटबॉल प्रशिक्षकांसाठी डी परवाना प्रशिक्षण शिबिर झाल्याचा अभिमान वाटला. या महाविद्यालयात उत्तम शिक्षणाबरोबरच खेळाला देखील प्रोत्साहन दिले जाते. फुटबॉल स्पर्धा व प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उपप्राचार्य डॉ. भालसिंग यांनी फुटबॉल खेळाचे तंत्र व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शिबिरार्थींना घेतलेल्या सहभागाचे कौतुक केले. तर फुटबॉल खेळातही उत्तम करिअरच्या संधी असल्याचे सांगितले. उपप्राचार्य डॉ. रज्जाक सय्यद यांनी अहमदनगर महाविद्यालय नेहमीच खेळाला प्राधान्य देत आहे. यापुढेही अशा उपक्रमांना सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.


एज्युकेटर कोच सलिम पठाण यांनी अतिशय उत्तमपणे शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. आजचे प्रशिक्षक भविष्यात उत्तम खेळाडू घडविणार आहे. अहमदनगर शहराला फुटबॉलसाठी चांगले भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थींनी फुटबॉल खेळणे व प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना घडविणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या प्रशिक्षणाने खुप काही शिकण्यास मिळाल्याची भावना व्यक्त केली.


यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, खजिनदार राणा परमार, सचिव रॉनप फर्नांडीस, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, सहसचिव व्हिक्टर जोसेफ, कार्यकारिणी सदस्य पल्लवी सैंदाणे, राजेंद्र पाटोळे, रमेश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते भाऊ भिंगारदिवे, प्रशिक्षक तथा कार्यकारिणी सदस्य जेव्हिअर स्वामी, सहखजिनदार रणबिरसिंग परमार उपस्थित होते.
सचिव रॉनप फर्नांडिस यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. प्रास्ताविक सहसचिव प्रदीपकुमार जाधव यांनी केले. फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी सर्व प्रक्षिणार्थींना शुभेच्छा दिल्या. आभार पल्लवी सैंदाणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *