• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जन शिक्षण संस्थेत युवा कौशल्य दिवस साजरा

ByMirror

Jul 15, 2024
जन शिक्षण संस्थेत युवा कौशल्य दिवस साजरा

युवतींना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी केले मार्गदर्शन

नोकरीपेक्षा नोकरी देणारे युवक निर्माण झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारले जाणार -खलील हवालदार

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांसह युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविणाऱ्या शहरातील जन शिक्षण संस्थेत युवा कौशल्य दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पार्लर व फॅशन डिझायनिंगच्या प्रशिक्षणार्थी युवतींना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक खलील हवालदार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, संस्थेत प्रशिक्षण घेऊन स्वत:चा पार्लर व्यवसाय उभा केलेल्या कविता तडके, संध्या म्हस्के, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, देशाची वाढती लोकसंख्येमुळे नोकरीचा प्रश्‍न बिकट बनला आहे.

मात्र युवक-युवतींची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात युवकांमध्ये कौशल्य विकसीत करुन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. शिक्षणातून नोकरी ही विचारसरणी बदलली पाहिजे, यासाठी शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड द्यावी लागणार आहे. जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 40 हजार महिला व युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले असून, त्या मधील अनेकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. शहरापुरते मर्यादीत न राहता, ग्रामीण भागात जाऊन महिला व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारणीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांची देखील माहिती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


खलील हवालदार म्हणाले की, युवा शक्तीच्या जोरावर भारत पुढे जात आहे. युवकांमध्ये कौशल्य निर्माण करुन त्यांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. नोकरीपेक्षा नोकरी देणारे युवक निर्माण झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारले जाणार आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून महिला, युवक-युवतींना व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या भांडवल व विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.


जन शिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेऊन व प्रशिक्षकाची भूमिका पार पाडून स्वतःचा व्यवसाय उभे केलेल्या पार्लरच्या संचालिका कविता तडके यांनी भाड्याच्या खोलीत सुरु केलेला व्यवसाय ते शहरात स्व:चा गाळा घेऊन सुरु केलेले पार्लर आणि अकॅडमीच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती दिली. तसेच संध्या म्हस्के यांनी महिलांनी स्वतः मधील कौशल्य विकसित केले पाहिजे. रोजगाराच्या अनेक संधी असून, इतरांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखापाल अनिल तांदळे, प्रशिक्षिका मंगल चौधरी, उषा देठे, विजय बर्वे आदींनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *