सृष्टीचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज -मा.प्रा. मुरलीधर दहातोंडे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या बालाजी फाऊंडेशनच्या वतीने नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, मलहिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान परिसरात 501 झाडांची लागवड करण्यात आली. माजी प्राचार्य मुरलीधर दहातोंडे (सर) यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, बालाजी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पठाडे, प्रसिध्दी प्रमुख प्रशांत पाटील शेळके, माजी उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे, माका गावचे उपसरपंच अनिलराव घुले, चेअरमन मल्हारी आखाडे, प्रगतशील शेतकरी तुळशीराम तांबे, देवस्थानचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे, विश्वस्त बन्सी आप्पा मुंगसे, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी, संभाजीराव पठाडे, प्रवीण मुंगसे, महेश चेडे, संकेत मुंगसे, माजी पर्यवेक्षक चामुटे, मल्हारी अंधारे, शिवम कुटे, वायरमन सतीश हंडाळ, तुळशीराम कचरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिवाजीराव पठाडे यांनी बालाजी फाऊंडेशन पर्यावरण संवर्धनासाठी सुरु केलेल्या वृक्षरोपण चळवळीची माहिती देऊन सण, उत्सव व वाढदिवस वृक्षरोपणाने साजरे करण्याचे आवाहन केले.
बन्सीभाऊ एडके, आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत, सागर बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
माणिकराव होंडे पाटील यांनी वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनाचा उद्देश सफल होणार असून, प्रत्येकाने निसर्गाची सेवा व पूजा म्हणून वृक्षरोपण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी प्राचार्य मुरलीधर दहातोंडे यांनी सृष्टीचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. बालाजी फाऊंडेशनचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य दिशा देणारे असून, या सामाजिक कार्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. ही लागवड डेन्स फॉरेस्ट व मियां वाकी पद्धतीने करण्यात आली आहे. लावण्यात आलेल्या झाडांमध्ये देशी झाडांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश दहातोंडे यांनी केले. आभार माऊली गोयकर यांनी मानले.