• Wed. Oct 15th, 2025

बालाजी फाउंडेशनची वृक्षारोपणाने शाहू महाराज जयंती साजरी

ByMirror

Jun 26, 2024

समाजकल्याण कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या बालाजी फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती वृक्षरोपणाने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कार्यालयाच्या आवारात समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.


राधाकिसन देवढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांनी कल्याणकारी राज्य चालविले. राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख पुसून त्यांच्याशी जवळीक साधली. सर्व समाजाचा बिकट बनलेला पर्यावरणाचा प्रश्‍न वृक्षारोपणाने सुटणार असून, या उपक्रमाद्वारे शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरल्याचे त्यांनी सांगितले.


व्याख्याते तथा लेखक आनंद शितोळे यांनी शाहू महाराज यांचे कार्य आणि व्यसन मुक्ती या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले. बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे म्हणाले की, निसर्गाच्या सानिध्यात जीवनातील तणाव दूर होतो. यासाठी शहर परिसर निसर्गाने फुलविण्याची गरज आहे. निसर्ग बहरल्यास पर्यावरणाचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कोकाटे, लेखाधिकारी राहुल गांगुर्डे, अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापिका प्रणिता सरपटे, वसंतराव नाईक महामंडळाचे सर व्यवस्थापक सांगळे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, बालाजी फाउंडेशनचे सचिव शिवाजी उबाळे, राज ठाणगे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील शेळके आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. चितळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील शेळके यांनी केले. आभार एजाज पिरजादे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *