अहमदनगर(प्रतिनिधी)- आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्री स्कूलमध्ये इंग्रजी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी युकेजी च्या मुलांना पदवीदान समारंभाप्रमाणे शैक्षणिक वर्षाचे निकाल देऊन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. काळा गाऊन व डोक्यावर टोपी परिधान करुन आलेल्या लहान चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले परिवर्तन एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष राम शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020- 2021 च्या निकालाचे वाटप करण्यात आले. शिंदे म्हणाले की, पुर्व प्राथमिक शिक्षण हे उज्वल भवितव्याचा पाया आहे. प्राथमिक दशेत विद्यार्थी घडत असतो आणि त्या गुणवत्तेवर त्याची भावी वाटचाल सुरु असते. विद्यार्थ्यांना सक्षमरित्या घडविण्यासाठी ऑर्किड प्री स्कूलमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तर शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतरांचे त्यांनी कौतुक केले. आपल्या मुलांचा गुणगौरव पाहण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतून बाहेर पडणार्या युकेजीच्या मुलांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शालेय शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमरिन सय्यद यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व विकासासाठी राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे सचिव प्रवीण साळवे व अध्यक्षा शितल साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीन अग्रवाल व सफीरा शेख यांनी केले. पालकांसाठी विविध उपक्रम शुभांगी अमोलिक यांनी घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता बोरडे व सुशिला आहिरे यांनी परिश्रम घेतले.