• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमला

ByMirror

Mar 27, 2024

कलागते परिवाराने केले आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा! अशा हनुमान चालीसा पठनाने व विविध भाव-भक्ती गीतांनी रेल्वे स्टेशन रोडवरील मल्हार चौक दुमदुमला. शेकडो नागरिकांचा प्रतिसाद या भजनसंध्या कार्यक्रमाला लाभला.


मंगलभक्त सेवा मंडळाने हनुमान जयंतीच्या निमित्त एक महिना आधीपासूनच नगर शहरांमध्ये विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी (दि.25 मार्च) रेल्वे स्टेशन रोडवरील मल्हार चौकात ही भजन संध्या रंगली. उद्योजक मारुती व विष्णू कलागते यांनी या भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर, या हनुमान चालीसाच्या विविध चालीतील गायनाने कार्यक्रमात भक्तीचे रंग उधळले. नागरिकांनी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यानंतर मंगल भक्त सेवा मंडळाचे प्रमुख राजाभाऊ कोठारी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हनुमान चालीसा गायन व विविध भजने सादर झाली.


बाप्पा मोरया रे, तू वीर बली हनुमान तुम्हारा क्या कहना, सीने मे मेरे सिताराम बसते, कर दो बेडा पार मेरे उज्जैन के महाकाल, बाई माझ्या दुधात नाही पाणी अशा अभंग, गवळणी व भक्ती गीतांनी ही भजन संध्या उत्तरोत्तर रंगली. राम सियाराम, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या भजनानेही भाविक मंत्रमुग्ध झाले. श्री शंकर महाराजांचे स्तवन सादर झाले. हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमासाठी प्रकाश भागानगरे, प्रणव कलागते, शिवम कलागते, अजिंक्य कलागते, सुदर्शन कलागते यांनी परिश्रम घेतले. हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंगल भक्त सेवा मंडळ तर्फे हनुमान चालीसा पुस्तिका ही मोफत देण्यात आली. हनुमान चालीसा दरम्यान कलागते परिवाराने फटाक्यांची आतषबाजी करीत भाविकांचे स्वागत केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *