• Sun. Jul 20th, 2025

शिवाजी साळवे यांचा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने गौरव

ByMirror

Feb 27, 2024

सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्याबद्दल सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्याबद्दल चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांना सम्राट अशोक विचार मंच व संत रोहिदास महाराज सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.


संत रविदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सक्कर चौक येथील ओम गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी पोलीस उपायुक्त बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते साळवे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मीराताई शिंदे, माजी नगरसेवक अशोक कानडे, दिनेश देवरे, सूर्यकांत गवळी, भाऊलाल निंभोरे, गोविंदराव खटावकर, कार्यक्रमाचे संयोजक निलेश बांगरे, विजय घासे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवाजी साळवे गेल्या तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. कामगार क्षेत्रातही त्यांचे कार्य सुरु आहे. इंडियन सिमलेस कंपनीमध्ये युनियनचे अध्यक्ष व सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे. सामाजिक विषयांवर त्यांनी आंदोलन करुन व पाठपुरावा करुन सर्वसामान्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. चर्मकार संघर्ष समितीचे ते अध्यक्ष असून, संघटनेच्या माध्यमातून गटई कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करुन महापालिका हद्दीत त्यांना पीचपरवाने मिळवून दिले.

समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. वधू-वर परिचय मेळावे, अन्याय झाल्यास मदतीला धावणे, रोजगार मिळावे घेणे, व्यवसायात गरजूंना मदत करणे, समाजाला संघटित करण्यासाठी मेळावे व महापुरुषांची जयंती उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीसपदाची देखील ते जबाबदारी सांभाळत असून, त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *