शहराच्या वैभवात भर टाकणारे व समाजाला दिशा देणारे संत रविदास महाराज विकास केंद्र उभे राहत आहे -आ. संग्राम जगताप
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, सभागृह, रविदास महाराजांचे साहित्य व वाचनालयाचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या वैभवात भर टाकणारे व चर्मकार समाजाला दिशा देणारे संत रविदास महाराज विकास केंद्र उभे राहत आहे. या केंद्राद्वारे समाजाला हक्काची जागा मिळाली असून, येथे होणाऱ्या वैचारिक बैठकीतून समाजाचा विकास साधला जाणार आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश येवून निधी प्राप्त झाला. निधी मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

अहमदनगर महानगरपालिका व सामाजिक न्याय विभागच्या माध्यमातून नगर-मनमाड रोड, कॉटेज कॉर्नर येथे उभारण्यात येत असलेल्या संत रविदास महाराज विकास केंद्राचे भूमिपूजन संत गुरु रविदास महाराज यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जेष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, प्रा. माणिक विधाते, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, मनपाचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. सचिन धस, माजी नगरसेवक अशोक कानडे, चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, महिला जिल्हाध्यक्षा रुक्मिणीताई नन्नवरे, बलराज गायकवाड, मनपा पाणीपुरवठा विभागाचे इंजि. रोहिदास सातपुते, शिवाजी साळवे, लोकनेते घनदाट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, रामदास उदमले, आर्किटेक कल्याण सोनवणे, दयानंद कवाळे, अरुण गाडेकर, रामदास सोनवणे, मनिष कांबळे, अरुण आहेर, विनोद कांबळे, रामदास सातपुते, दिलीप कांबळे, गणेश नन्नवरे, रुपेश लोखंडे, विलास कदम, दिनेश देवरे, सुभाष सोनवणे, मनोज गवांदे, श्रीपती ठोसर, संदीप सोनवणे, अर्जुन कांबळे आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून संजय खामकर यांनी राज्यात संघटन उभे केले. समाजाला संघटित करुन ते विकासात्मक दिशा देत आहे. कोरोनाच्या काळात मिळालेल्या 50 लाखाच्या निधीला स्थगिती आल्याने या केंद्राचे काम रेंगाळले, मात्र मोठा प्रयत्न करुन पुन्हा 50 लाखाचा निधी मिळवून हे काम मार्गी लावले जात आहे. या वास्तूचे काम थांबता कामा नये. सर्व समाजबांधवांनी यासाठी तन, मन व धनाने योगदान दिल्यास या वास्तूशी भावनिक नाते जोडले जाणार आहे. हे केंद्र पुढील पिढीला फळदायी ठरणार असून, प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे त्यांनी आवाहन केले.
संजय खामकर म्हणाले की, चर्मकार समाजातील स्वप्नातील केंद्र उभे राहत आहे. आमदार जगताप यांनी चर्मकार समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेवली. जातीपातीचे राजकारण न करता सर्व समाजाला बरोबर घेऊन ते चालत आहे. सर्व समाज देखील एकनिष्ठपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. तर शहरात होणारे संत रविदास महाराज विकास केंद्र राज्याला दिशा देणारे केंद्र ठरणार असून, याद्वारे युवक-युवतींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, सभागृह, संत रविदास महाराजांचे साहित्य व वाचनालयाचा समावेश राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संपत बारस्कर म्हणाले की, क्षणाचा विलंबही न लावता, आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या माध्यमातून चर्मकार समाजाला या केंद्रासाठी एक एकरची जागा देण्यात आली. या केंद्राद्वारे संत रोहिदास महाराजांचे विचार समाजामध्ये रुजणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी साळवे यांनी समतावादी नेतृत्व शहराला आमदार जगताप यांच्या माध्यमातून मिळाले आहे. सर्व समाज त्यांच्याशी जोडला गेला असून, ते मंत्री व्हावे व शहराचा आनखी विकास व्हावा ही सर्व नगरकरांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक कानडे म्हणाले की, समतेचा महान संदेश रविदास महाराजांनी देवून राजसत्तेत समतेचा विचार मांडले. त्यांच्या विचाराला सार्थ ठरविणारे कार्य आमदार जगताप करत आहे. समाजाच्या वेदना कळले की, त्याचे उपायही सापडतात. राजकारण बाजूला ठेवून आमदार जगताप यांनी चर्मकार समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. समाजाचे आजही अनेक प्रश्न असून, विविध पक्ष, संघटनेत कार्य करताना समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. तर नव्याने उभे राहत असलेले केंद्र समाजाला दिशा देणारे ठरणार असल्याचे सांगितले.

डॉ. सागर बोरुडे यांनी समाजातील अधिकारी वर्गाने सामाजिक देणे लागते या भावनेने समाजातील दुर्बल घटकांसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. रतनलाल सोनाग्रा यांनी भारतीय संविधानात रविदास महाराजांचे विचार उमटतात. दुःख दूर करणारे व श्रमिकांचा विचार करणारे संत रविदास यांचे विचार होते. जीवनात श्रम करणे महत्त्वाचे असून, दिखाव्याचे वैभव नको असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले. आभार कवी सुभाष सोनवणे यांनी मानले.