• Mon. Jul 21st, 2025

केडगाव भूषणनगर येथे संत रविदास महाराज सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन

ByMirror

Feb 25, 2024

संत गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

समाजाच्या विकास कामात कोणीही राजकीय चाल करू नये -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय चालीमुळे विकास कामे रेंगाळली जातात. समाजाच्या विकास कामात कोणीही राजकीय चाल करू नये. काम कुणी केले? हे सर्वसामान्यांना सगळे माहीत असते. श्रेय कोणी घेतले तरी चालेल, मात्र नागरिकांची विकासकामे थांबवून त्यांना त्रास देण्याचा व अडचणीत आणण्याचे काम कोणी करु नये. केडगावात उभे राहत असलेल्या संत रविदास महाराज यांचे सामाजिक सभागृहाचे काम शहर व उपनगरातील रस्त्यांच्या कामामुळे विकासकामे सर्वांच्या डोळ्यासमोर येणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.


संत गुरु रविदास महाराज यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त केडगाव भूषणनगर येथे संत रविदास महाराज सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. प्रारंभी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महाराज सेवा संघाचे निलेश बांगरे, विजय घासे, माजी नगरसेवक अशोक कानडे, शिवाजीराव साळवे, नगरसेवक संपत बारस्कर, माजी नगरसेवक सुनील (मामा) कोतकर, प्रताप काळे, प्रा. माणिक विधाते, गजेंद्र भांडवलकर, दत्ता खैरे, कांबळे सर, दिनेश देवरे, हरिशचंद्र आखाडे, अशोक घेवरे, कैलास घेवरे, सुभाष बागळे, सुभाष साळवे, प्रा. सुभाष चिंधे, सुभाष बागडे, जगदीश घेवरे, कन्हैयालाल परदेशी, योगेश डोंगरे, माणिक लव्हाळे, संतोष शेळके, अजय शेळके, वैभव घासे, विशाल डोंगरे, सुरजमल डोंगरे, चंपालाल धनवटे, जयराज शेळके, मयूर बांगरे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी या सभागृहासाठी व शहराच्या विकासात्मक कामासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने विकास कामे मार्गी लागली आहेत. सभागृहासाठी 50 लाख रुपयाच्या निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून, यापुढे देखील निधी मिळणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तर समाजाचे प्रश्‍न मांडण्यासाठी व समाज एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ असणे गरजेचे असून, या सभागृहाच्या माध्यमातून चर्मकार समाज एकत्र येवून विविध प्रश्‍न सोडविणार असल्याची आशा व्यक्त केली. तर दुसऱ्यांदा महापौर झाल्यानंतर चर्मकार समाजासाठी ही जागा मनपाच्या माध्यमातून देण्यात आली, तर आमदार असताना त्याला मुर्तरुप येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्ताविकात निलेश बांगरे म्हणाले की, समाजाचे विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची जागा नव्हती, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने सदर सभागृहाचे काम मार्गी लागले आहे. या जागेमुळे होणाऱ्या सभागृहात समाजाला बसण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक, महिला व जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अशोक कानडे म्हणाले की, चर्मकार समाजातील उपेक्षित घटकांचे अनेक प्रश्‍न आहे. समाज एकत्र आल्यास त्यांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने निलेश बांगरे यांनी आमदार जगताप यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला या सभागृहाच्या माध्यमातून यश आले असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराज शेळके यांनी केले. आभार मयूर बांगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *