रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
टाळेबंदीत घरोघरी जावून अनेक अल्पवयीन मुलींचे लग्न लावल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- टाळेबंदीत घरोघरी जावून अनेक अल्पवयीन मुलींचे लग्न लावणाऱ्या चितळे रोड येथील त्या काझीचे (मौलाना) 2019 पासून ते आज पर्यंतचे सर्व विवाह लावलेले रजिस्टर तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक आघाडीचे गुलाम अली शेख, विनीत पाडळे, मुन्ना भिंगारदिवे, संदीप वाघचौरे, निशांत शेख, शहेबाज शेख आदी उपस्थित होते.
चितळे रोड येथील तो काझी (मौलाना) व्यवसाय करुन लग्न लावण्याचे काम करत आहे. कोरोनाच्या टाळेबंदीत लग्नाला बंदी असताना सदर व्यक्तीने अनेक ठिकाणी घरोघरी जावून चूकीच्या पध्दतीने व अल्पवयीन मुलींचे देखील लग्न लावलेले असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
समाजात बालविवाह हा गंभीर गुन्हा असून, गुपचूपपणे सदर काझीने घरगुती पध्दतीने अनेक विवाह लावून दिले आहे. तर काही विवाहचे रेकॉर्ड देखील त्याकडून लपविले जात आहे. विवाह लावल्यानंतर त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय येथील रजिस्टर मॅरेज कार्यालय किंवा मनपाच्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक असताना असली कोणतीही प्रक्रिया न करता सर्व माहिती दडविण्याचे काम सदर काझी करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणी त्या काझीने 2019 पासून ते आज पर्यंतचे सर्व विवाह लावलेले रजिस्टर तपासावे व त्यामध्ये असलेल्या त्रुटी, अल्पवयीन मुलींचे विवाह लावल्याप्रकरणी संबंधित काझीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे.