बनावट औषधे रोखण्यासाठी होलसेलर केमिस्टांना महत्त्वाची भूमिका घ्यावी लागणार -अभिमन्यू काळे
केमिस्ट बांधवांच्या विविध प्रश्नावर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट औषधे रोखण्यासाठी होलसेलर केमिस्ट बांधवांना महत्त्वाची भूमिका घ्यावी लागेल. सध्या होलसेलर केमिस्टांची जबाबदारी वाढली असून, औषधे मागविताना काळजी घ्यावी लागणार आहे. परराज्यातून औषधी खरेदी करणे पाप नाही व बेकायदेशीर देखील नाही. पण या प्रक्रियेत काही बनावट औषधे येऊ नये, यासाठी जागृक होण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बनावट औषधे रोखण्यासाठी होलसेलर बांधवांकरीता कार्यशाळा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना काळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य अजित पारख, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक बेर्डे, हेमंत मेतकर, भूषण मोरे, अन्न औषध निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, जावेद शेख, महादेव निमसे, सेंट्रल झोनचे शशांक रासकर, चेतान कर्डिले, जिल्हा सचिव आबासाहेब बेद्रे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत भुजडी, अतुल चांगले, गणेश वाणी, खजिनदार प्रशांत उबाळे, भरत सुपेकर, मनीष सोमाणी, महेश आठरे, मनोज खेडकर आदींसह जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका प्रमुख, पदाधिकारी व केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे काळे म्हणाले की, अनेक औषधे मागविताना चुकून एखादा बनावट औषध आल्यास याची कल्पना देखील होलसेलर केमिस्ट बांधवांना नसते. त्यामुळे तो चूक नसताना कायदेशीर अडचणीत सापडतो. यासाठी बनावट औषधे रोखण्यासाठी सावध होवून जागृत व्हावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर मेल व बिलिंग पध्दतीवर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात अजित पारख यांनी केमिस्ट व्यावसायिकांना येणाऱ्या अडी-अडचणीची माहिती देऊन येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांना एकजुटीने पुढे जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पार पडलेल्या या कार्यशाळेत उपस्थित पाहुणे व केमिस्ट बांधवांनी विविध विषयावर चर्चा करुन प्रश्न व शंकाचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित धाडगे यांनी केले. आभार आबासाहेब बेद्रे यांनी मानले.