अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक व कवी डॉ. सुदर्शन धस यांच्या आनंदाने गाऊया या बालकविता संग्रहास पुणे येथील मातंग साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.
नुकतेच पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथे दुसरे मातंग ऋषी साहित्य संमेलन पार पडले. यामध्ये संमेलनाध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते धस यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष पद्मश्री भिकुजी उर्फ दादा इदाते आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

धस यांच्या आनंदाने गाऊया या बालकविता संग्रहास बालवाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी या बालकाव्य संग्रहातील वैविध्यपूर्ण विषयांचे कौतुक केलेले आहे. प्रसिद्ध लेखक व साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार विजेते कवी एकनाथ आव्हाड यांची पाठराखण या पुस्तकाला लाभलेली आहे.
डॉ. सुदर्शन धस हे रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांचा भावशलाका हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला असून, त्याला राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
