काम करणाऱ्यांना पक्षात संधी -अनिल शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या नगर तालुका प्रमुखपदी अजित विठ्ठल दळवी तर महिला आघाडी (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी मीराताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. आयटीआय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा कार्यालयात जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव व शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते दळवी व शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी युवा सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष पै. महेश लोंढे, अल्पसंख्यांक आघाडीचे सर्फराज खान, माने सर, नंदकुमार ताडे, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, संदीप भोईटे, आनंदराव शेळके, नितीन गायकवाड, अक्षय मोरे, विवेक मोरे, रोहित पाथरकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिल शिंदे म्हणाले की, काम करणाऱ्यांना पक्षात संधी दिली जात आहे. तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व निर्माण केले जात आहे. पक्षात काम करताना प्रत्येकाने सक्रीय राहून योगदान द्यावे. दळवी यांनी नगर तालुक्यात शिवसेनेचे शाखा सुरु करुन शेतकरी, कष्टकरी व तरुणांना पक्षाला जोडण्याचे काम केले आहे. तर शिंदे यांनी महिलांचे मोठे संघटन करुन पक्षाला जोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षाच्या माध्यमातून संधी देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप सातपुते यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन कार्य केले जात असून, सामाजिक कार्य करणाऱ्यांना सन्मानाने काम करण्याची संधी दिली जात असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.