मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचा उपक्रम
वंचित विद्यार्थ्यांना जीवनात उभे करणे प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी -कॅप्टन प्रवीण पिल्ले
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देऊन जीवनात उभे करणे प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांनी आपल्या परीने योगदान दिल्यास वंचित वर्ग प्रवाहात येण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन कॅप्टन प्रवीण पिल्ले यांनी केले.
तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांना मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद, प्रा. युनूस शेख, नाझीम कुरेशी, अक्षय शिरसाठ, निकाळजे, शहराध्यक्ष नवाब देशमुख, आयन सय्यद, मुजीर सय्यद आदी उपस्थित होते.

अल्ताफ सय्यद म्हणाले की, सण-उत्सव वंचितांबरोबर साजरे केल्यास तो आनंद द्विगुणीत होणार आहे. कोरोना काळातही प्रतिष्ठानने गरजूंना आधार दिला. वंचित घटकातील मुलांना आधार देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. युनूस शेख यांनी परिस्थितीवर मात करुन जीवनात यश मिळवता येते. नाउमेद न होता, कठोर परिश्रमाने आपले ध्येय गाठावे. बालघर प्रकल्पामधून शिक्षण घेऊन मुले भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर व मोठ्या पदावर कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे व त्यांना पुढे घेऊन जाण्याचे काम बालघर प्रकल्प करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमास कॅप्टन पिल्ले यांचे विशेष योगदान लाभले.