मानवसेवेच्या कार्याला आर्थिक मदत देऊन कार्याचे कौतुक
मानवसेवा प्रकल्पाचे कार्य अप्रतिम आणि ह्रदयाला स्पर्श होणारे -संजय कुमार
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात मानवतेसाठी निस्वार्थी आणि ह्रद्याला स्पर्श करणारी सेवा सुरु आहे. ही सेवा एखाद्या प्रार्थनेसारखीच ह्रदयाला भिडणारी आसल्याची भावना महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांनी व्यक्त केली.
रस्त्यावरील बेघर, निराधार व मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचा सांभाळ करुन त्यांचे पुन्हा समाजात पुनर्वसन करण्याचे काम करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरुणगाव रोड येथील मानवसेवा प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांनी भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली.

पुढे संजय कुमार यांनी कोणत्याही शासकीय, निमशासकीय अनुदानाशिवाय सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. मानवसेवा प्रकल्पातील निराधार, पिडीत मनोरुग्णांना आणि वेठबिगारीतून मुक्त केलेल्या कामगारांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगामार्फत मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर संस्थेला आर्थिक मदतीचा धनादेश दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार, आयोगाच्या रजिस्टार श्रीमती स्वरुपा ढोलाम, इंटरनॅशनल जस्टीस मिशन मुंबईचे राज्य प्रकल्प संचालक येशूदास नायडू, लिला नंदा, केअरींग हॅण्डसचे संस्थापक अंबादास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी प्रास्ताविकात म्हणाले की, रस्त्यावरील निराधार पिडीत मनोरुग्णांना पोलीसांच्या मदतीने मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन त्यांच्यावर उपचार, समुपदेशन करुन कुटुबात पोहचवण्याचे सेवा कार्य सुरु आहे. अमानुष आयुष्य जगणाऱ्या वेठबिगारी कामगारांची मुक्तता करुन त्यांना न्याय मिळवून देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवाकार्य करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेलवंडी पोलीसांच्या पुढाकारातून 23 वेठबिगार कामगारांची मुक्तता करण्यात आली आणि या वेठबिगार मुक्त कामगारांना आधार देऊन त्यातील 6 व्यक्तींचे मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले आहे. यासाठी इंटरनॅशनल जस्टीस मिशन मुंबई च्या लिला नंदा आणि दिलीप गुंजाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वेठबिगारीतून मुक्त करण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी संस्थेचे स्वयंसेवक सिराज शेख, अंबादास गुंजाळ, महेश येठेकर, ऋतिक बर्डे, सुशांत गायकवाड, सोमनाथ बर्डे, मथुरा जाधव, पुजा मुठे, सरिता गोडे, मंगेश थोरात, स्वप्नील मधे यांनी विशेष परिश्रम घेतले.