शहरासह सात जिल्ह्यातील लोकांनी घेतला लाभ; 5 लाख 34 हजार रुग्णांची मोफत तपासणी
गोर-गरीबांच्या सेवेसाठी शहरात फिनिक्स नेत्रालय उभारला जाणार -जालिंदर बोरुडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात नेत्र दोष असलेल्या शेतकरी कष्टकरी कामगारांना नेत्र उपचाराचा लाभ मिळावा यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनने सुरू केलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराने तेराशे सत्तरचा टप्पा ओलांडला आहे. या शिबिरात झालेल्या शस्त्रक्रियेतून तब्बल 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांना दृष्टी मिळाली आहे. 31 वर्षात आत्तापर्यंत सुमारे 3 लाख 11 हजार जणांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया झाली आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या प्रयत्नातून दरमहा हे शिबिर घेतले जात असून, शिबिरातून आतापर्यंत 7 लाख पेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये सव्वा लाख शेतकरी वर्ग आहेत.
नगर मधील जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत राहून बोरुडे यांनी ही चळवळ चालवली आहे. सध्या ते सेवानिवृत्त झाले असून, पूर्ण वेळ त्यांनी या सेवा कार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. 1991 मध्ये त्यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशन सामाजिक संस्थेची स्थापना केली. नागरदेवळे व शहरातील इतर ठिकाणी पुण्यातील के.के. आय बुधराणी, आनंदऋषीजी नेत्रालय, जिल्हा रुग्णालय आणि इतर खासगी नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने दर महिन्याला मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेतात. शिबिरासाठी बोरुडे स्वतः खर्च करतात.

आत्तापर्यंत या शिबिरातून सुमारे 3 लाख 11 हजार रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया झालेली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 7 हजार शेतकऱ्यांची मोफत शस्त्रक्रिया झालेली आहे. अनेक जिल्ह्यातून या शिबिरात उपचारासाठी नागरिक येत आहे. नेत्र शिबिराबरोबरच रक्तदान, अस्थिरोग, महिलांच्या विविध आजारांच्या तपासण्या, आयुर्वेद, पंचक्रम, हृदयरोग तपासणी, हिमोग्लोबिन आदी तपासणी शिबिर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे 31 वर्षात जालिंदर बोरुडे यांनी सरकारी अथवा खाजगी एकही रुपयांचे अनुदान घेतलेले नाही. ते दर महिन्याला स्वतःच्या पगारातून तर सध्या पेन्शन मधून 10 हजार रुपये खर्च करतात.
नेत्र तपासणी शिबिराबरोबर नेत्रदान व अवयवदान चळवळ देखील चालवली जात आहे. यामध्ये 63 हजार रुग्णांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. बोरुडे सातत्याने नेत्रदान व अवयवदान चळवळीची जनजागृती करत आहे. शिबिरातून आत्तापर्यंत 63 हजार लोकांकडून नेत्रदान करण्याचे संकल्प अर्ज भरुन घेण्यात आले आहे. हे अर्ज जिल्हा रुग्णालय व विविध नेत्र पिढीत जमा करण्यात आले आहे. आतापर्यंत 430 लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झालेले असून, त्यातून 860 लोकांना नेत्ररोपणाने नवी दृष्टी मिळाली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला या शिबिराचा मोठा फायदा होत आहे. महागडी वैद्यकिय सुविधा सर्वसामान्यांना पेळवत नाही. नेत्र दोष असलेल्या गोर-गरीबांच्या सेवेसाठी शहरात फिनिक्स नेत्रालय उभारणीचा संकल्प असून, त्या दृष्टीने कार्य सुरु आहे. या नेत्रालयात गरजूंना मोफत नेत्र सेवा दिली जाणार आहे. आईच्या प्रेरणेने सुरु झालेली चळवळ ही एका मोठ्या नेत्रालय हॉस्पिटलच्या माध्यमातून बहरणार आहे. हे नेत्रालय सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास काम करणार आहे. -जालिंदर बोरुडे (अध्यक्ष, फिनिक्स सोशल फाऊंडेशन)