• Sun. Jul 20th, 2025

शहरात कर्करोग जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ

ByMirror

Feb 6, 2024

महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल, जायंट्स ग्रुप व मॅक केअर हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

कॅन्सरचे योग्य वेळी निदान व उपचार होणे आवश्‍यक -डॉ. सतीश सोनवणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात कर्करोगाची जनजागृतीच्या होण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल, जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर व मॅक केअर हॉस्पिटलचा संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करुन गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. तर कर्करोगाबद्दल माहिती देण्यात आली.


महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपायुक्त अजित निकज, डॉ. सतीश राजुरकर, डॉ. तेजश्री जुनागडे, डॉ. अमित करडे, डॉ. सतीश सोनवणे, नम्रता मकासरे, जायंट्स वेल्फेअरचे सदस्य संजय गुगळे, डॉ. गणेश बडे,जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष पूजा पातुरकर, यतीमखानाचे सचिव फारुक शेख, दीपक मुथा, अभय मुथा, अनिल गांधी आदींसह महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


डॉ. सतीश सोनवणे म्हणाले की, वेळेत उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. कॅन्सरचे योग्य वेळी निदान व उपचार होणे आवश्‍यक आहे. कॅन्सर झाल्यास घाबरुन न जाता त्याचा सामना करुन त्या आजारातून बाहेर पडण्याचे त्यांनी आवाहन केले. डॉ. तेजश्री जुनागडे यांनी ब्रेस्ट कॅन्सर वरील लक्षणे व उपचार यावर महिलांनी घ्यावयाची काळजी याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अमित करडे यांनी गर्भपिशवीचा कॅन्सर व लसीकरण यासंबंधी माहिती दिली. नम्रता मकासरे यांनी निरोगी आरोग्यासाठी आहार, व्यायाम व जीवनशैलीस सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.


संजय गुगळे म्हणाले की, कॅन्सर रोगामुळे भारतात अनेकांचे बळी जात आहेत, वेळेवर निदान व उपचार न झाल्याने बरा होणारा कॅन्सर जीवघेणा बनला आहे. रुग्णांनी वेळोवेळी तपासणी करून उपचार घेणे आवश्‍यक आहे. जायंट्सच्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जनजागृती या सप्ताहाद्वारे केली जाणार असल्याचे सांगून जायंट्स ग्रुपच्या सामाजिक कार्याची त्यांनी माहिती दिली.


स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश बडे, डॉ. अमित करडे यांनी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरणाचे संच बाळासाहेब देशपांडे दवाखान्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांच्याकडे सुपूर्द केले. तर कै.बाळासाहेब देशपांडे दवाखाना मधील गरोदर मातांना जायंट्स ग्रुपच्या वतीने प्रोटीन सप्लीमेंट डब्यांचे व यतीमखाना मधील मुलींना ड्रायफ्रूटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन डॉ. दीपमाला चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक डॉ. वृषाली पाटील यांनी केले. आभार डॉ. सतीश राजुरकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *