कामातील अनियमितता व अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
शासकीय सेवेत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर बडतर्फ करा
अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध विकास कामातील अनियमितता व अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व शासकीय सेवेत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.5 फेब्रुवारी) अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषदेत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. वारंवार कारवाई करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असताना प्रशासनाला जाग आणण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, पांडुरंग धरम, संजय कोरडे, पप्पू शेटे आदी सहभागी झाले होते.
पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा, गोरगाव, माळकुप, काळकुप, वारणवाडी, जांबुत येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होऊन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील कामातही अनियमितता झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या मेहेकरी (ता. नगर) येथील विद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी यांना 2010 मध्ये तिसरे अपत्य झाले आहे. त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम 2005 चे उल्लंघन केले आहे. त्या व्यक्तीने ही माहिती लपवून शासनाची फसवणुक केलेली आहे. तसेच तो व्यक्ती नातेवाईकांच्या नावे जेसीबी, ट्रॅक्टर, चार चाकी वाहने व डंपर खरेदी करून खाजगी व्यवसाय करत आहे. शासकीय सेवेत असताना खाजगी व्यवसाय करता येत नसताना देखील त्याने सर्व नियमांची पायमल्ली केली असल्याचे स्पष्ट करुन त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
अनेक तक्रारी व पाठपुरावा करुन देखील जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाचे प्रश्न मार्गी लागत नाही. कामातील अनियमितता व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडे वेळोवेळी दाद मागूण देखील प्रतिसाद मिळत नसल्याने यापुढे आनखी तीव्र आंदोलन करुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जागरण गोंधळ घातले जाणार आहे. -अरुण रोडे (जिल्हाध्यक्ष, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती)