मानवसेवा प्रकल्पाचा पुढाकार
उर्वरीत वेठबिगारी कामगारांच्या कुटुंबाचा शोध सुरु
अहमदनगर (प्रतिनिधी)- वेठबिगारी कामातून मुक्तता करण्यात येऊन श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आलेल्या कामगारास त्याच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले. उर्वरीत वेठबिगारी कामगारांच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांचे देखील पुनर्वसनाचे कार्य सुरु आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या वतीने 23 वेठबिगारांची मुक्तता करुन त्यांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात उपचार व पुनर्वसनासाठी दाखल करण्यात आले होते. या लाभार्थींना मानवसेवा प्रकल्पात आरोग्यासह सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येत आहेत. वेठबिगारीतून मुक्त झालेल्या कामगारांचे समुपदेशनातून माहिती मिळवून त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळवली जात आहे. तर त्यांचे पुनर्वसन करुन अमानुष आयुष्य जगणाऱ्या वेठबिगारांच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्याचे कार्य मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु आहे.
संस्थेच्या स्वयंसेवकांनी घाबरलेल्या कामगारांना बोलते करुन सात जणांचे कुटुंब शोधण्यात यश मिळवले आहे. समुपदेशनातून संपुर्ण माहिती संकलीत करुन उत्तर प्रदेशचा भैय्यालाल मोरया उर्फ भोला याचे कुटुंब शोधण्यात यश आले. भैय्यालाल याला श्रीगोंदा दिवाणी न्यायालयाच्या न्यायमुर्ती श्रीमती काटकर यांच्या परवानगीने आणि बेलवंडी पोलीसांच्या साक्षीने कुटुंबाच्या स्वाधीन करीत पुनर्वसन करण्यात आले. अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाचे कार्य खरोखर माणुसकी जपणारे असल्याची भावना न्यायमुर्ती काटकर यांनी व्यक्त केली.
उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच कुटुबाच्या ताब्यात देऊन पुनर्वसन केले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे यांनी सांगितले. भैय्यालाल उर्फ भोलाच्या पुनर्वसनासाठी पोलीस निरीक्षक संतोष भंडारी, कैलास शिफनकर, शरद गांगुर्डे, कविता माने, कोळपे, पी.सी. दिवटे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे स्वयंसेवक सिराज शेख, ऋतिक बर्डे यांनी परिश्रम घेतले.