भाजप युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व -राहुल लोणीकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व आहेत. या युवकांमधूनच नेते व लोकप्रतिनिधी घडणार असून, जबाबदारी खांद्यावर घेऊन युवकांनी कामाला लागावे. भाजप पक्षात वारसा पाहून नव्हे, तर कर्तुत्व पाहून जबाबदारी सोपविण्यात येते. हा आजवरचा इतिहास राहिला आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना आपले नेतृत्व सिद्ध करता येणार असल्याचे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची आढावा बैठक युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचूघोळ, सचिन पारखी, प्रशांत मुथा, पंडित वाघमारे, प्रिया जानवे, महेश नामदे उपस्थित होते.

पुढे लोणीकर म्हणाले की, भाजपला पूर्वी दोन खासदार असलेला पक्ष म्हणून हिणवले जायचे. मात्र जगातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान भाजपला लाभला आहे. देशात सर्वाधिक खासदार व अनेक राज्यात सर्वाधिक आमदार असलेला हा पक्ष आहे. पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या युवकांकडे मोठी जबाबदारी असून, युवकांनी ही जबाबदारी ओळखून भविष्यात वाटचाल करावी. युवकांनी केंद्रातील कल्याणकारी योजना सर्वसामान्यापर्यंत घेऊन जावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे देशाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. जगात भारताला प्रतिष्ठा मिळाली व विकासदर देखील वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचूघोळ म्हणाले की, भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून शहरात उत्तमप्रकारे संगठन करण्यात आले आहे. युवक भाजपचे विचार घेऊन घराघरा पर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी युवकांची शक्ती एकजुटीने कामाला लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
कल्याण रोड येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयस नराल यांच्यासह अनेक युवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला. सर्व युवकांनी भाजपच्या विचारधारेने कार्य करुन पक्षाला बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.