वकील दाम्पत्यांचा खून प्रकरणाचा निषेध
वकिलांना समाजात निर्भयपणे काम करण्यासाठी प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालया समोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देऊन राहुरी येथे झालेल्या वकील दाम्पत्यांचा खून प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. तर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वकिलांना समाजात निर्भयपणे काम करण्यासाठी प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली.

राहुरी येथील वकील दाम्पत्य ॲड. मनीषा आढाव व ॲड. राजाराम आढाव यांची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असताना वकिलांमध्ये संतप्त भावना असून, अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. तर हत्या झालेल्या आढाव दाम्पत्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी साहेबान जहागीरदार, मुज्जू शेख, नवेद शेख, खालिद शेख, वहाब सय्यद, सादीक शेख, दानिश शेख, सरफराज खान, समीर खान, शाकिर शेख, शाहनवाज शेख, अल्ताफ शेख, यासर इम्तियाज शेख, अब्दुल खोकर, सनाउल्ला खान, कैफ शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहेबान जहागीरदार म्हणाले की, वकील दाम्पत्यांचे निर्दयीपणे झालेली हत्याचे प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजे.कायद्याने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे व कायद्याने नागरिकांना संरक्षण देणारे आज समाजात सुरक्षित नाही. वकील वर्ग सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत असतात. एखाद्याचा रोष अंगावर त्यांना काम करावे लागते. त्यांना कायद्याचे संरक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वहाब सय्यद यांनी मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली असून, या घटनेमुळे वकील वर्ग असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. वकिलांना काम करण्यासाठी संरक्षण कायद्याची गरज असल्याचे सांगितले.