नगर शहर व तालुक्यातील माध्यमिक शाळांना संगणक प्रिंटरचे वाटप
शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी घेऊन कार्य सुरु -शिक्षक आमदार किशोर दराडे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक व शाळांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आलेले आहे. काही प्रश्न प्रलंबित असून, प्रलंबित असलेल्या शालार्थ आयडी व संच मान्यता मिळण्यासाठी पुणे येथील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालया समोर उपोषण केले जाणार आहे. शिक्षकांना झालेल्या त्रास हा मला झालेला त्रास असून, अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा हेतू नाही. शिक्षकांचे प्रश्न सुटावे हाच त्यामागचा प्रामाणिक हेतू असल्याची भावना आमदार शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केली.

शिक्षक व शाळांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरदराडे दोन दिवसासाठी नगर शहर व तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले असताना माध्यमिक शाळांना संगणक व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार दराडे बोलत होते. यावेळी यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वरिष्ठ लेखा अधिकारी मनोज शिंदे, वेतन अधीक्षक रामदास म्हस्के, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, उपाध्यक्ष मिथुन डोंगरे, नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहोकले, संभाजी पवार, भास्करराव सांगळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे सदस्य महेंद्र हिंगे, रयत शिक्षण संस्थेचे भाऊसाहेब पांडुळे, अशोक आव्हाड, डमाळे आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार दराडे म्हणाले की, शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी घेऊन काम सुरू आहे. शिक्षकांचे मेडिकल बिल व राष्ट्रीयकृत बँकेत पगार होण्याचा महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यात आलेला आहे. तर विभागातील पाचही जिल्ह्यात शिक्षक दरबार घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात पुन्हा एक शिक्षक दरबार घेऊन प्रलंबित प्रश्न अधिकाऱ्यांचे उपस्थित सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. तर शिक्षकांनी मोठा विश्वास टाकलेला असून, त्यांना हृदयात ठेवून कामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शहरातील व नगर तालुक्यातील शंभर माध्यमिक शाळांना संगणक तर 20, 40, 60 टक्के अनुदानीत शाळांना प्रिंटर वाटप करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविकात वैभव सांगळे यांनी जिल्ह्यातील 700 शाळांना अद्याप पर्यंत आमदार दराडे यांनी संगणक उपलब्ध करुन दिले आहेत. शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम ते सातत्याने करत आहे. विविध प्रश्न सुटण्यासाठी शिक्षकांना देखील भविष्यात दराडे यांच्या पाठीशी उभे रहावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन विविध कामाचा आढावा घेतला.

शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, राष्ट्रीयकृत बँकेत शिक्षकांचे पगार होण्यासाठी आमदार किशोर दराडे यांचा महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अधिकाऱ्यांना विचारात घेऊन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असतो. मेडिकल बिल ऑनलाईन करण्यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला. अभ्यासू शिक्षक आमदार म्हणून त्यांची कारकीर्द शिक्षकांमध्ये रुजली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर आमदार दराडे यांनी त्यांचे स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तर शिक्षणाधिकारी कडूस यांनी विविध प्रश्नावर शिक्षकांच्या शंकाचे निरसन केले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकेत पगार होण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल आमदार दराडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश उघडे यांनी केले. आभार अशोक आव्हाड यांनी मानले.