विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेचे घडविले दर्शन
पालकांना बेटी बचाव बेटी पढावची शपथ -डॉ. सुधा कांकरिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचे दुष्परिणाम, रामायण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्त्रीजीवन, अध्यात्म या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विविध गितांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक भारावले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. सुधा कांकरिया यांच्या हस्ते झाले. डॉ. श्रीकांत पाठक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे विश्वस्त अरविंद धिरडे, सचिव गजेंद्र सोनवणे, खजिनदार संजय सागांवकर, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, व्हाईस चेअरपर्सन मृणाल कनोरे, सचिव विक्रम पाठक, संचालक बाबासाहेब वैद्य, छाया साळी, शुभदा वल्ली, सुनिल पावले, नगरसेवक शामभाऊ नळकांडे, सचिन शिंदे, पुनम कवडे, संतोष गेनप्पा, मुख्याध्यापिका कल्पना भामरे आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा. फक्त मनोरंजन पुरते कार्यक्रम मर्यादीत न ठेवता मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती देखील मिळणे महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर कौशल्य आत्मासात होण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रारंभ गणेशवंदना व सरस्वती पूजनाने झाले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून शिक्षणाबरोबरच मुलांना इतर कला-कौशल्य आत्मसात करण्याचा संदेश दिला. डॉ. सुधा कांकरिया यांनी बेटी बचाव बेटी पढावची शपथ दिली. तर आज मुलींचा घटता जन्मदर चिंतेचा विषय बनल असून, मुलींची संख्या कमी होत आहे. अनेक मुलांचे लग्न होत नसल्याने ते युवक तणावाखाली आत्महत्या करत आहे. समाजात मुलांची संख्या वाढत असून, भविष्यात मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे देखील अवघड होणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गर्जे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चंदा कार्ले व जगन्नाथ कांबळे यांनी करुन दिला. आभार शेख बबनभाई गुलाबभाई यांनी मानले.
