• Sun. Jul 20th, 2025

निमगाव वाघात राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत युवा शक्तीचा जागर करुन व्यसनमुक्तीचा संदेश

ByMirror

Jan 15, 2024

निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन; व्याख्यान, लोकनृत्य व लोकगीतांमधून सामाजिक विषयांना हात

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत युवा शक्तीचा जागर करुन व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. तर युवक-युवतींसह शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा पार पडली. नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात निरोगी आरोग्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांचा प्रतिसाद लाभला. व्याख्यान, लोकनृत्य व लोकगीतांमधून सामाजिक विषयांना हात घालण्यात आला. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांवर झालेल्या पोवड्यांनी सभागृह निनादले.


स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलाने राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, अनिताताई काळे, कार्यक्रमाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, डॉ. सुलभा पवार, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे, कवयित्री प्रतिभा खैरनार, कवी सखाराम गिरे, डॉ. विजय जाधव, गुलाब कापसे, भागचंद जाधव, भाऊसाहेब ठाणगे, अनिल डोंगरे, शिवाजी होळकर, दिलावर शेख, अजय लामखडे, वसंत पवार, साहित्यिक रज्जाक शेख, डॉ. विलास मढीकर, गणेश भगत, जालिंदर बोरुडे आदींसह युवक-युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती असून, त्यांच्या माध्यमातून बदल घडणार आहे. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करुन, सामाजिक कार्याने वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमास आमदार निलेश लंके यांनी भेट देऊन ग्रामीण भागात राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तर आमदार लंके म्हणाले की, सर्वसामान्यांना आधार व युवकांना दिशा देण्याचे कार्य डोंगरे संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सुरु आहे. युवकांमध्ये परिवर्तन घडविण्याची शक्ती असून, युवकांनी क्रांती केल्याचा इतिहास आहे. युवकांना योग्य दिशा मिळाल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. तर समाजात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन डोंगरे संस्थेच्या माध्यमातून त्यांना पुरस्काररुपाने प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी महिला सक्षमीकरणाचा संदेश देऊन ग्रामीण भागातील युवती व महिलांसाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ग्रामीण भागात कला, क्रीडा व सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्याचे कार्य डोंगरे संस्था करीत असून, या बरोबरच सामाजिक चळवळीला बळ देण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड यांना उत्कृष्ट कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व पर्यावरण क्षेत्रात योगदान देऊन सामाजिक कार्य करणाऱ्यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आले.


निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. स्त्री रोग तज्ञ डॉ. सुलभा अमित पवार यांनी महिलांच्या आरोग्यावर निरोगी स्त्री निरोगी कुटुंब या विषयावर मार्गदर्शन केले. तर रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्त केंद्राचे सहकार्य लाभले. आरोग्यावर मार्गदर्शन व रक्तदान शिबिराचा उपक्रम विशेष घटक युवक कल्याण प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमातंर्गत पार पडले.


सोलापूर येथील कलाकार फुलचंद नागटिळक यांनी एकपात्री नाटकचे सादरीकरण करुन सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला. संक्रांतनिमित्त गावातील महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय वाडकर यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियंका डोंगरे-ठाणगे, अतुल फलके, संजय पुंड, पिंटू जाधव, शबनम डफेदार, मोहसीन शेख, कोमल ठाणगे, मंदाताई डोंगरे, प्रतिभा डोंगरे आंदीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *