छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथेचे सादरीकरण
विविधतेने नटलेल्या भारतातील सांस्कृतिक, लोककला व परंपराचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथेचे सादरीकरण करताच विद्यार्थी-पालकांनी शिवाजी महाराजांचा एकच जयघोष केला. नृत्याविष्कारातून मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियात गुंतलेल्या सध्याचे पिढीवर भाष्य केले. तर सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला.

सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. लेझीम व बॅण्ड पथकाच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजाभाऊ अमरापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शशिकांत फाटके, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष धनंजय भंडारे, शालेय संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब विधाते, सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मयूर विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी वार्षिक अहवाल सादर करून शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख मांडला. शाळेत औषधी वनस्पती व इतर झाडांची फुलविण्यात आलेली नर्सरीचा ऑक्सिजन प्रकल्प व भौतिक, शैक्षणिक सुविधांसह राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रास्ताविकात अमोल मेहत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमाची माहिती दिली.पाहुण्यांचे परिचय भाऊसाहेब पुंड व सचिन बर्डे यांनी करुन दिला.

शाळेच्या ज्ञानसागर या तेराव्या वार्षिक अंकाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तर कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
डॉ. शशिकांत फाटके म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. शालेय जीवन पुन्हा नसून, विद्यार्थी दशेपासूनच ध्येय निश्चित करा. प्रचंड स्पर्धा असून, स्पर्धेत टिकण्यासाठी दहा वर्षापुढील नियोजन आजच करण्याचे त्यांनी सांगितले. तर आई-वडिलांचा त्याग व कष्टाची जाणीव ठेऊन व्यसनापासून लांब राहून चुकीच्या गोष्टींपासून लांब राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

धनंजय भंडारे यांनी शिक्षणाच्या मार्कावरुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरत नाही. शैक्षणिक क्षेत्रात कमी गुण मिळाले तरी खचून न जाता आपल्या आवडीनिवडी ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याचे सांगितले. तर जागृत विद्यार्थी होण्याचे आवाहन करुन विविध प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वाचे संपर्क नंबर आपल्या वहीत ठेवण्याचा सल्ला दिला.
राजाभाऊ अमरापूरकर म्हणाले की, प्रामाणिकपणा असला की जीवनात यशाचे मार्ग सापडतात. प्रामाणिकपणे जिद्दी व मेहनतीने कष्ट करून ध्येय गाठावे. प्रत्येकाच्या अंगात विशेष गुणवत्ता असून, स्वतःला कमी न लेखता इच्छाशक्तीच्या जोरावर जीवनाची वाटचाल करण्याचे त्यांनी सांगितले.

गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी जंगल जंगल पता चला…, मेरे पापा… या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण केले. विविधतेने नटलेल्या भारतातील सांस्कृतिक, लोककला व परंपराचे दर्शन नृत्यातून घडविण्यात आले. घंटागाडी या गाण्यावर सादरीकरण करुन सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. तर मोबाईलचे दुष्परिणाम सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी दर्शविले. जिजाऊंचा लाडका पुत्र झाला छत्रपती…. व माय भवानी…. या गाण्यातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास उलगडला. ऑस्कर मिळालेल्या नाचो नाचो… गाण्यावर तर विद्यार्थी ठेका धरुन एकच धमाल केली. विविध गीतांवर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका गायकवाड, लता म्हस्के यांनी केले. आभार संतोष सुसे व नीता जावळे यांनी मानले.