युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती -अश्विनी वाघ
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रगती फाऊंडेशनच्या वतीने बटर फ्लाय नर्सरी मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.
प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी वाघ, प्रियंका जाधव, अलका शेटे, लता आंधळे, मंगला तवले, उज्वला ढुमणे, चंदा कुमारी, विक्रम भुतकर आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
अश्विनी वाघ म्हणाल्या की, युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती आहे. समाजात बदल घडविण्यासाठी राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन मुलांवर संस्कार घडविण्याची गरज आहे. तर मुलांमध्ये स्वामी विवेकानंद यांचे विचार रुजविल्यास त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळणार आहे. अशा व्यक्तीमत्वांच्या विचारांनी समाजाची प्रगती होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.