मासूम संस्थेचा भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये उपक्रम
संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींचे भवितव्य उज्वल -शिरीष मोडक
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबईच्या मासूम संस्थेमार्फत नवनीत 21 अपेक्षितचे 80 प्रश्नसंचाचे वाटप करण्यात आले.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, रात्र शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, संचालिका ज्योतीताई कुलकर्णी, रात्र शाळेचे प्राचार्य सुनील सुसरे, संजय पाठक आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रात्र शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी यांनी रात्र शाळेचा वाढता गुणवत्ता आलेख सादर करुन यावर्षी देखील विद्यार्थी कष्ट व मेहनतीच्या जोरावर चांगले यश मिळवणार असल्याची आशा व्यक्त केली. तर मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, वरिष्ठ व्यवस्थापक गुरुप्रसाद पाटील, एस.एस.सी. विभाग प्रमुख शशिकांत गवस, वरिष्ठ कार्यक्रम प्रमुख कमलाकर माने, कार्यक्रम प्रमुख संदीप सूर्यवंशी व नगर जिल्ह्यामधील रात्रशाळांना सहकार्य करणाऱ्या बजाज फिनसर्व्ह कंपनीचे विशेष आभार मानले.
शिरीष मोडक म्हणाले की, संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींचे भवितव्य उज्वल आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जीवनात बदल घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचा पाया ठरत आहे. नाईट स्कूलमध्ये दिले जाणारे कौशल्यपूर्ण शिक्षण प्रेरणादायी असून, विद्यार्थ्यांनी जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून यशाचे शिखर गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.
अजित बोरा यांनी रात्र शाळेतील विद्यार्थी दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेतात हे कौतुकास्पद बाब असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. नवनीत प्रकाशनचे संजय पाठक यांनी नवनीत स्टडी पार्क या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती व बक्षीस योजनेची माहिती माहिती देऊन नवनीत 21 अपेक्षित वर आलेल्या स्कॅनरचा आधार घेऊन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची सविस्तर माहिती देऊन, प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करून दिले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दहावी मधील 80 विद्यार्थ्यांना नवनीत 21 अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. आभार संदेश पिपाडा यांनी मानले.