• Tue. Jul 22nd, 2025

आमदार व्हायचे असल्यास! काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांनी अगोदर स्वत:ला सिध्द करावे -अजीम राजे

ByMirror

Jan 9, 2024

वैयक्तिक द्वेषातून भांडण तंट्यामध्ये गुंतले असल्याचा आरोप

इंडिया आघाडीतून काढता पाय घेऊन एकप्रकारे भाजपची बी टीम म्हणून राजकारण

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपाने नगरकरांच्या मुळ विकासात्मक मुद्दयांना बगल देण्याचे काम करत आहे. नगरसेवक होण्याची पात्रता नसताना आमदार होण्याचे स्वप्न बाळगून फक्त पत्रकार परिषदेद्वारे वैयक्तिक द्वेष व भांडण तंट्यामध्ये ते गुंतले असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केला आहे.


काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे वैयक्तिक राजकारणातील आरोप-प्रत्यारोप काँग्रेस पक्षाला परवडणारे नाही. भाजप विरोधात इंडिया आघाडी काम करत असताना, ते शहरातील इंडिया आघाडीच्या कोणत्याही आंदोलन व चळवळीत सहभाग न घेता एकप्रकारे भाजपची बी टीम म्हणून राजकारण करत असल्याचे राजे यांनी प्रसिध्दीपत्रात म्हंटले आहे.


काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांना आमदार व्हायचे असल्यास अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागणार आहे. त्यानंतर आमदारकीचे स्वप्न पहावे. त्यांच्या वैयक्तिक राजकारणामुळे शहराचे वातावरण देखील दूषित होत आहे. ते स्वत: पक्षाचे प्रमुख समजून वैयक्तिक अजेंडा राबवित आहे. यामुळे अनेक काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते देखील पक्षापासून दुरावले आहेत. तर मित्र पक्षांचा विचार न करता त्यांचे कार्य सुरु आहे.


इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष भाजप सरकारचा खोटा चेहरा जनते समोर आणण्याचे काम करत आहे. मात्र शहरातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांबरोबर सहभागी न होता, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षांचा प्रसिध्दीचा वेगळाच स्टंट सुरु आहे. इंडिया आघाडीतून त्यांचा काढता पाय एकप्रकारे भाजपला समर्थन देणारा आहे. त्यांनी वैयक्तिक राजकारणाचे मुद्दे व भांडण सोडून शहराच्या विकासात्मक दृष्टीने व इडिया आघाडीचे उमेदवार लोकसभेत निवडून आणण्यासाठी कामाला लागावे. आरोप-प्रत्यारोपापलीकडे देखील राजकारण असते, याची जाणीव ठेवावी. आरोप-प्रत्यारोप व वैयक्तिक भांडणात जनतेला रस नसून, जनतेला कामे हवी असल्याचे राजे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *