• Mon. Jul 21st, 2025

विजय भालसिंग यांना शिवस्वराज्य संस्थेचा भूमीपुत्र पुरस्कार जाहीर

ByMirror

Jan 5, 2024

गेल्या दोन दशकापासून करत असलेल्या सामाजिक कार्याचा होणार सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आयडॉल भूमीपुत्र पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे व उपाध्यक्ष सुरेश शिरसाठ यांनी भालसिंग यांच्या पुरस्काराच्या निवडीची नुकतीच घोषणा केली.


सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) असलेले भालसिंग एसटी बँकेत कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे. गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. गाव पातळीवर विकासात्मक कार्याला चालना देऊन त्यांचे समाजकार्य सुरु आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


16 जानेवारी मुकुंदपूर येथील श्रीरामसाधना आश्रम (ता. नेवासा) येथे आजी-माजी खासदार, आमदार तसेच साधू-महंत यांच्या उपस्थितीमध्ये भालसिंग यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *