सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील मुलींनी वेधले लक्ष
महिलांच्या हाती क्रांतीची लेखणी देऊन सावित्रीबाई फुले यांनी सर्वांचे जीवन समृध्द केले -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत स्त्री शिक्षणाचा जागर करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीच्या लेकींनी हातात पाटी, पेन्सील घेऊन स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद केले. तर सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधले.
मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, संगिता नजन, सविता काजळकर आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्री मुक्तीची चळवळ चालवली. मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी खुले केले. त्यांनी दिलेल्या योगदानाने आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई यांनी समाजाला प्रकाशमान केले. तर महिलांच्या हाती क्रांतीची लेखणी देऊन त्यांनी सर्वांचे जीवन समृध्द केले, असे काळे म्हणाल्या.