• Sun. Jul 20th, 2025

राजभवनात नगरचे बांधकाम व्यावसायिक राजेश भंडारी यांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराने गौरव

ByMirror

Dec 31, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील बांधकाम व्यावसायिक हर्षल उर्फ राजेश भंडारी यांना बांधकाम क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन अंतर्गत भंडारी यांना बेस्ट यंग बिजनेस टायकून इन रिअल इस्टेट ॲण्ड कन्स्ट्रक्शन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.


केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 2023 वर्षाचा हा पुरस्कार भंडारी यांना मिळाला आहे.


टाकळी ढोकेश्‍वर या छोट्याशा गावातून आलेले राजेश भंडारी यांनी वडिलांचा कापड व्यवसाय सांभाळला. त्यानंतर 2009 साली दुर्घटना घडून वर्षानुवर्षे चालत आलेला व्यवसाय आगीत जळून भस्मसात झाला. दोन वर्षांनी पुन्हा त्यांनी या व्यवसायाची उभारणी केली व त्याला प्लॉटिंगच्या व्यवसायाची जोड दिली. बांधकाम क्षेत्रातील व्यवसाय इतक्या जोमाने वाढीस लागला की, अवघ्या दोन-तीन वर्षात महावीर होम्स नावारूपाला आला. त्यांनी मुंबई, पुणे यांसारख्या मोठ-मोठ्या शहरांत ज्याप्रमाणे उत्तम दर्जाचे भव्यदिव्य प्रकल्प उभारले जातात अगदी त्याचप्रमाणे दर्जेदार प्रकल्प शहरात उभारण्यास प्रारंभ केले. बांधकाम क्षेत्रात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण करुन विविध प्रकल्पाच्या माध्यमातून नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला.


बांधकाम क्षेत्राबरोबरच त्यांनी आपल्या वडिलोपार्जित कापड व्यवसायातसुद्धा भक्कमपणे पाय रोवले. विविध क्षेत्रात व्यवसाय करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून योगदान दिले. कोरोना काळात अनेक गरजूंना अन्नदान, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करुन सातत्याने सामाजिक उपक्रमात ते हातभार लावत आहे. महावीर ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे बांधकाम क्षेत्रात उत्तमपणे कार्य सुरु असून, सहाशेपेक्षा अधिक बेरोजगारांना त्यांनी रोजगाराची संधी निर्माण करुन दिली आहे. राजेश भंडारी यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी देखील विविध पुरस्काराने सन्मान झाला आहे. बांधकाम क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


स्वतःचे साम्राज्य शून्यातून उभं करणे, हे सोपं काम नसतं. यासाठी प्रचंड मेहनत घेऊन स्वत:ला झोकून द्यावे लागते. मोठा त्रास सहन करावा लागतो. असंख्य अडचणींना तोंड देऊन वाटचाल करावी लागते. जो व्यक्ती या सर्व गोष्टींवर मात करुन पुढे जातो. तो आपले साम्राज्य उभं करतो. -राजेश भंडारी (बांधकाम व्यावसायिक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *