गावासाठी केलेल्या विकासात्मक कार्याची व सामाजिक योगदानाची घेतली दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना नाशिक येथील भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव व आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बावा यांच्या हस्ते डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात डोंगरे यांना पवित्र कुरानची भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी विनोद अंबरकर, अलकाताई गायकवाड, नाशिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, संस्थेचे अध्यक्ष राहुल मोरे, सचिव महेश मुळे, वाजिद खान आदी उपस्थित होते.

निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम घेऊन निस्वार्थ भावनेन तेे योगदान देत आहे. गावात वाचनालय चालवून युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य सुरु असून, पर्यावरण संवर्धन व गावात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ त्यांनी चालवली आहे. कोरोना काळात बंद झालेली बस सेवा त्यांनी पाठपुरावा करुन ग्रामस्थांसाठी सुरु करुन दिली.
तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्याचे व नागरी सुविधा निर्माण करुन देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. गावातील अनेक महत्त्वांच्या रस्ते होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन सदर कामे मार्गी लावली. विकासात्मक कार्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. ग्रामपंचायतमध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.