सरपंच सेवा संघाने घेतली बोरुडे यांच्या निस्वार्थ कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणणारे नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शहरातील माऊली संकुल सभागृहात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य संघटक अमोल शेवाळे, यादवराव पावसे, रोहित पवार, उद्योजिका वंदनाताई पोटे, रविंद्र पवार, राजेंद्र गिरी, रविंद्र पावसे, ॲड. प्रविण कडाळे, श्रीराम शिंदे, दुर्गा भालके, निलेशकुमार पावसे, संजय काळे आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी गेल्या 31 वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशन व इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत. नुकतेच गरजू नागरिकांवर मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रमी 3 लाख 1 हजार 111 चा टप्पा पार झाला आहे.
या सेवेच्या माध्यमातून त्यांनी दृष्टी दोष असलेल्यांना नवीन दृष्टी देण्याचे सेवा कार्य केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात देखील त्यांनी गरजू रुग्णांना शिबिराच्या माध्यमातून मोठा आधार दिला. तसेच नेत्रदान चळवळीत उत्कृष्ट कामगिरी करुन अनेकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित केले. तर त्यापैकी काहींनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प देखील पूर्ण केला आहे. निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.