महिलेकडून 10 लाखाची मागणी; कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- सोशल मीडियावर ओळख करुन व जवळीक साधून शहरातील युवा सराफ व्यावसायिकाला पैश्यासाठी हनी ट्रॅपमध्ये अडकवून 10 लाख रुपयाची मागणी केल्याप्रकरणी प्रेमदान हडको येथील एका महिलेसह, त्याच्या दोन नातेवाईक महिला आणि एका पुरुष व्यक्तींवर कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बुऱ्हाडे या सराफ व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरुन सदरचा गुन्हा दाखल झाला आहे.
मे 2023 पासून ते 18 डिसेंबर पर्यंत प्रेमदान हडको येथील त्या महिलेने सोशल मीडियावर फिर्यादीशी ओळख करुन वेळोवेळी मेसेज करून किरीट सोमय्या सारखा तुझा व्हिडीओ असल्याचे सांगून सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली. 10 हजार रुपये स्वीकारून लग्न कर नाहीतर 10 लाख रुपये मुलींच्या नावावर टाक अन्यथा खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरुन सदर महिला, तिचे दोन महिला नातेवाईक व योगेश उर्फ सोनू पोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे 2023 मध्ये प्रशांत बुऱ्हाडे यांची सोशल मीडियावर प्रेमदान हडको येथील एका महिलेशी मैत्री झाली होती. त्यानंतर सदर महिलेने बुऱ्हाडे यांना भेटण्यास यायला सांगितले. त्यांनी नकार दिल्याने महिलेने शहरातील त्यांच्या सराफच्या दुकानात येऊन अडीच ग्रॅमची सोन्याची अंगठी घेतली. त्याचे फक्त तीन हजार रुपये दिले. सदर महिला तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून गोड बोलू लागली. त्या महिलेने फिर्यादीला गांधी मैदान येथे बोलावून व्हाट्सअप मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 हजार रुपये उकळले. त्यानंतर त्या महिलेने तुझा किरीट सोमय्या सारखा व्हिडिओ असल्याचे सांगून बदनामी करण्याची धमकी दिली. त्या महिलेने वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली.
10 डिसेंबर रोजी अनोळखी मोबाईलने फोन करून दोघांमध्ये झालेल्या व्हाट्सअप वरील मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी घाबरुन त्या महिलेने बोलावलेल्या पाईपलाईन रोडवरील कॅफेवर गेला. तिथे सदर महिला तिचे नातेवाईक असलेल्या दोन मैत्रिणी समोर मुलीच्या नावावर प्रत्येकी 5 लाख रुपये टाक, नाहीतर माझ्याशी लग्न कर, नाहीतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी त्या महिलेने दिली.
यावेळी योगेश उर्फ सोनू पोटे याने देखील तेथे येऊन महिलेला पैसे देण्यास फिर्यादीला धमकावले. तेथून निघून गेल्यानंतर 16 डिसेंबर रोजी फिर्यादीच्या सराफ दुकानात महिलेने येऊन त्याचे वडिल व कामगार यांच्या समोर पैश्याची मागणी केली. 18 डिसेंबर रोजी पुन्हा दुकानात येऊन सदर महिलेने धमकी दिल्याचे बोऱ्हाडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.