धर्म व सत्यासाठी शीख समाजाने मोठे बलिदान दिले -जनक आहुजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्र बाबा अजित सिंहजी, बाबा जुझार सिंहजी, बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह सिंहजी यांच्या शहिद दिनानिमित्त घर घर लंगर सेवेच्या वतीने तारकपूर येथील अन्न छत्रालयात नागरिकांसाठी पाच दिवस सकाळी मोफत चहा, नाष्टाची सेवा सुरु करण्यात आली.
या सेवेच्या माध्यमातून परिसरातील गरजू नागरिक, हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईक यांना चहा व नाष्ट्याचे मोफत वितरण केले जात असून, ही सेवा 31 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह…. च्या जयघोषात बुधवारी (दि.27 डिसेंबर) या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, मनोज मदान, करन धुप्पड, सनी वधवा, सतीश गंभीर, कुमार असीजा, जगदीश भागचंदानी, जेठालाल चूग, अंकित भुतानी, डॉ. खन्ना, गुलशन कंत्रोड, बल्लू सचदेव, रामसिंग कथुरिया आदी उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, धर्म व सत्यासाठी शीख समाजाने मोठे बलिदान दिले आहे. हे बलिदान व त्याग आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. कोरोना काळात शीख, पंजाबी समाजाने लंगरच्या माध्यमातून सेवा दिली, ती आजही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. हरजितसिंह वधवा यांनी दरवर्षी शहिदी दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो. लंगर सेवेच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, सर्वसामान्य व गरजू घटकांना याचा लाभ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.