सदाशिव फरांडे अजूनही फरार
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेतील कोट्यावधी रुपयाच्या चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर मधील आरोपी दीपक पवार पारनेर शाखेत आला असता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. यामधील सदाशिव फरांडे हा एक आरोपी अजूनही फरार आहे.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत खातेदाराने तेथील क्लार्क, तत्कालीन शाखाआधिकारी सदाशिव फरांडे यांच्याशी संगनमत करून चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर करत राज्य शासनाचे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
सदाशिव फरांडे, दिपक पवार व रामचंद्र नेटके यांच्यावर मागील आठवड्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यावर सदाशिव फरांडे व दीपक पवार फरार झाले होते. कर्जत पोलीस त्यांचा शोध घेत असून आरोपी दीपक पवार हा सैनिक बँकेच्या पारनेर शाखेत आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू असून, सदर घोटाळ्यातील रक्कम कोणा-कोणाला देण्यात आल्या याची माहिती मिळणार आहे.
जबाबदार संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा
फरार असलेला सदाशिव फरांडे यांच्यावर संजय गांधी योजनेच्या अपहारातील दोन गुन्हे दाखल असून, त्याला अद्यापि अटक झालेली नाही. दिपक पवार यास अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकापासून त्याला वाचविण्यासाठी त्याला चेअरमन यांच्या केबिनमध्ये कुलूप लावून लपवून ठेवण्यात आले होते. पोलीस पथक माघारी फिरत असताना, पवार हा आतच असल्याचे समजल्यावर बँकेच्या कर्मचाऱ्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्याला बाहेर काढण्यात आले. संजय कोरडे यांनी घटनास्थळी वरून काढता पाय घेऊन त्याला पाठीशी घालणाऱ्या शिवाजी व्यवहारे व संजय कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बाळासाहेब नरसाळे व विनायक गोस्वामी यांनी केली आहे.