सरपंच सेवा संघाने घेतली भालसिंग यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहरातील माऊली संकुल सभागृहात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य संघटक अमोल शेवाळे, यादवराव पावसे, रोहित पवार, उद्योजिका वंदनाताई पोटे, रविंद्र पवार, राजेंद्र गिरी, रविंद्र पावसे, ॲड. प्रविण कडाळे, श्रीराम शिंदे, दुर्गा भालके, निलेशकुमार पावसे, संजय काळे आदी उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) असलेले भालसिंग एसटी बँकेत कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे. गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत.
गाव पातळीवर विकासात्मक कार्याला चालना देऊन त्यांचे समाजकार्य सुरु आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.