छत्रपती चौथे शिवाजी महाराज समस्त बहुजन समाजाचे राजे होते – डॉ. राजन गवस
अहमदनगर (प्रतिनिधी)- इतिहासाच्या खांद्यावर उभे राहून भविष्याकडे बघता बघता आपणही काही उद्बोधक काम केले पाहिजे. इतिहासाकडून आपल्याला स्फूर्ती मिळते, मात्र प्रत्यक्ष अन्यायाविरोधात लढण्याची ताकद आपल्या मनगटात असावी. समतेचे खरे प्रतीक म्हणजे राजर्षी शाहू महाराज त्यांनी वसतिगृहे स्थापन केली. शिष्यवृत्त्या दिल्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या असा उज्ज्वल इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे होते, तर शाहू महाराज रयेतेचे राजे होते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सर्व मोठी माणसे होती. त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्यासारखे काम आपण केले पाहिजे, छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे समस्त बहुजन समाजाचे राजे होते असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने आयोजित राज्य साहित्य पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रमात ते बोलत होते. हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार लि.अहमदनगर यांच्या वतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा आज (सोमवार दि. २५) आयोजित करण्यात आला होता. शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे राजर्षी शाहू महाराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी हुतात्मा स्मारक येथील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तुतारीच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, सिताराम खिलारी, मुकेश मुळे, जयंत वाघ, दीपक दरे, निर्मलाताई काटे, प्रा. अर्जून पोकळे, ॲड. सुभाष भोर आदी पदाधिकारी व सदस्य तसेच भांडारचे चेअरमन दत्ता पाटील नारळे, व्हा चेअरमन विजय जाधव, प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे. प्राचार्य एम.एम तांबे, प्राचार्य विजयकुमार पोकळे, समन्वयक प्रा. गणेश भगत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ऍड. विश्वासराव आठरे पाटील यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते साहित्यिकांना सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम दहा हजार एक रुपये महावस्त्र, ग्रंथ, पुष्पगुच्छ देऊन शाही पद्धतीने सन्मानित करून गौरविण्यात आले. जळगाव येथील शशिकांत हिंगोणेकर, वाई येथील रमेश चव्हाण, परभणीचे डॉ. आनंद इंजेगावकर, नांदेड येथील अशोक कुबडे, सोलापूरचे गणपत जाधव यांना हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरचे डॉ. मधुकर जाधव यांना ‘सरसेनापती प्रतापराव गुजर’ या संशोधन साहित्यासाठी विशेष साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कवी चंद्रकांत पालवे यांना जिल्हा पुरस्कार तर प्राचार्य डॉ. भि. ना. दहातोंडे, डॉ. अविनाश महाजन, प्रा. शालिनी वाघ, प्रा. रंगनाथ सुंबे ह्यांचा साहित्य गौरव करण्यात आला.

परीक्षक म्हणून ज्येष्ठ लेखिका प्रा. मेधा काळे, प्राचार्य एम. एम. तांबे, डॉ. बापू चंदनशिवे व पुरस्कार समिती समन्वय लेखक-प्रकाशक प्रा. गणेश भगत यांनी काम पहिले. सुमारे १३० पुस्तकांमधून दर्जेदार साहित्य रचना करणाऱ्या कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह, संशोधन व साहित्य अशा साहित्यकृतींची निवड केल्याचे प्रा. मेधा काळे यांनी सांगितले. पुरस्कारार्थी साहित्यिकांनी जिल्हा मराठा संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक आपल्या मनोगतातून केले. पुढे बोलताना ते म्हणाले की छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचं कार्य हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू महाराजांचा शिक्षण विचार आज अवलंबने गरजेचे आहे. आज शिक्षणाची परिस्थिती बिकट बनत चालली आहे जिल्हा परिषद शाळा बंद पडत असल्याने गरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमुळे मोठ्या प्रमाणात बहुजन समाजातील मुले सुशिक्षित झाली संस्थेने शिक्षणाने बहुजनांना विकासाची प्रकाश वाट दाखवली असे त्यांनी सांगितले तर लेखक होणे सोपे नाही धारदार तलवारीवरून प्रवास करावा लागतो लेखकांनी नेहमी सत्तेच्या विरुद्ध सर्वसामान्य हितासाठी लेखणी चालवावी व समाजाला दिशा देण्याचे त्यांनी आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात रामचंद्र दरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल माहिती दिली.व संस्थेतील प्राध्यापक शिक्षक यांनी लेखन करून ग्रंथ निर्मिती करावी. आपले संशोधन, साहित्य प्रकाशित केले पाहिजेत व नगरचे साहित्य विश्व समृद्ध करावं, आपल्या शाळा महाविद्यालयातील समृद्ध ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वापर करून त्याचा सामाजिक जीवनासाठी उपयोग करावा. नव साहित्य निर्मितीसाठी त्यांनी आवाहन केले आहे.तसेच संस्थेचे सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. सूत्रसंचालन संजय आखडे यांनी केले.भांडारचे चेअरमन दत्ता पाटील नारळे यांनी आभार मानले. यावेळी श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडाराचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ व साहित्य रसिक नगर जिल्ह्यातून व महाराष्ट्र भरातून मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, खूप अप्रतिम असा शाही पुरस्कार वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला.