अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अंकुश रावसाहेब शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.डी. थोरात यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अंकुश शेळके म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याची गरज आहे. या मुलांमधून भविष्यातील वैज्ञानिक घडणार आहे. वैज्ञानिक व तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजल्यास समाजाची प्रगती होऊन अंधश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरा हद्दपार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघाकडून नुकतेच झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेत शाळेच्या इयत्ता 6 वी मधील विद्यार्थिनी सिध्दी विकास निमसे हिने अकरावा क्रमांक पटकाविला आहे. इयत्ता 9 वी मधील साक्षी संजय वाबळे, सिद्धी विकास निमसे हे तालुकास्तरीय परीक्षेत पात्र ठरल्या.