कल्पनाशक्तीला तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी साकारले विविध प्रकल्प
स्पर्धामय व तंत्रज्ञानाच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य आत्मसात करावे लागणार -मोहंमद शादाब
अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) मदरसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद आयटीआय संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला तंत्रज्ञानाची जोड देऊन बनविलेले रूम हिटर, होल पंचिंग मशीन, होम सिक्युरीटी, स्क्रू जॅक, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट, वैक्यूम क्लिनर, वॉटर लेव्हल इंडिकेटर, रिवेटरचे प्रकल्प पाहून उपस्थित पाहुणे भारावले.
मदरसेचे प्रमुख (कारी) मोहंमद शादाब यांच्या हस्ते तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी आयटीआयचे प्राचार्य नदिम शेख, मौलाना अन्वर शेख, हंजला शेख, इलियास शेख आदी उपस्थित होते.

मोहंमद शादाब म्हणाले की, स्पर्धामय व तंत्रज्ञानाच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य आत्मसात करावे लागणार आहे. पुस्तकी शिक्षणाला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करुन बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तंत्रज्ञानाने काम करण्याची पद्धत बदलत चालली आहे. औद्योगिकीकरणात देखील नवीन तंत्रज्ञानाचे वारे वाहत असून, विद्यार्थ्यांनी आपल्याला आवड असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्राचार्य नदिम शेख म्हणाले की, बाराबाभळी मदरसा फक्त धार्मिक शिक्षणापुरता मर्यादीत नसून, येथील युवकांना सक्षम नागरिक घडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांना ईस्लाम धर्माचे संस्कारक्षम शिक्षण व आयटीआयच्या माध्यमातून त्यांच्यामधील कौशल्य विकसीत केले जात आहे. सक्षम पिढीतून सशक्त भारत घडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हुजैफा शेख, साबीर शेख, आसिफ पठाण यांनी परिश्रम घेतले.