बंधुभावची मूल्य रुजविण्यासाठी जे.एस.एस. गुरुकुलचा आगळा-वेगळा उपक्रम
एकात्मतेचे विचार मुलांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी दिशादर्शक ठरणार -आनंद कटारिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक एकतेचे विचार रुजविण्यासाठी शहरातील सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांची सहल घडविण्यात आली. समाजात व जाती-धर्मात वाढत चाललेले द्वेषपूर्ण वातावरणामुळे असहिष्णुता निर्माण होत असताना, भावी पिढीवर बंधुभावची मूल्य रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांची ही आगळी-वेगळी सहल राबविण्यात आली.
या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध धर्माच्या धार्मिक स्थळांना भेटी देऊन, त्या धर्माचे महत्त्व, विचार, प्रार्थना, सण-उत्सव, पूजा, भाषा व संस्कृतीची माहिती घेतली. शाळांमधून शिक्षण मिळते, पण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना संस्कार देण्यासाठी गुरुकुलच्या प्राचार्या निकिता कटारिया व संस्थापक आनंद कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शहरातील जैन मंदिर, झोपडी कॅन्टीन येथील दत्त मंदिर, तारकपूर येथील चर्च, गोविंदपुरा येथील गुरुद्वारा, बुऱ्हाणनगर रोड येथील ऐतिहासिक दमडी मस्जिद, आनंदधाम या धार्मिक स्थळांना भेट देऊन तेथील पुजारी, मौलाना, साधु-महंत यांच्याशी मनमोकळे संवाद साधला. तर त्या धर्मातील विविध पैलू जाणून घेतले. या सहली मधून कोणताही धर्म हिंसा शिकवत नसून, प्रत्येक धर्माने अहिंसेचा पुरस्कार केलेला असल्याचा विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला. हे विचार व शिकवण विद्यार्थ्यांना भविष्यात जीवनाची शिदोरी ठरणार आहे. तर सर्वधर्मसमभाव हे विचार रुजण्यास मदत होणार असल्याचे शाळेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
आनंद कटारिया म्हणाले की, देशात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र काही समाजविघातक प्रवृत्तींकडून जाती, धर्मात भांडण लावण्याचे कार्य केले जात आहे. येणाऱ्या पिढीमध्ये धार्मिक एकात्मतेचे विचार रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम मुलांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे सांगितले. तर मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कारक्षम शिक्षण व त्यांच्यातील कौशल्य विकसीत करुन एक सुसंस्कारी नागरिक घडविण्याचा शाळेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी पुनम भंडारी, राखी सुराणा, श्रीपाद ठाणेकर, बशीर शेख, मौलाना आझाद आदींसह सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांचे सहकार्य लाभले.